सोलापूर : युती गेली चुलीत, उखाड देंगे, फेक देंगे, अशी भाषा करीत शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत स्वबळाचा नारा देणारी शिवसेना आज सत्तेसाठी लाचार झाल्याचे दिसून येत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे एका खासगी कार्यक्रमासाठी सोलापुरात आले आहेत. शिवसेना-भाजप युती होणार यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेचा भाजपविरोध किती पोकळ होता, हे यावरून दिसून येईल.
समृद्धी महामार्गाचा विषय असो, भूसंपादन प्रक्रियेच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाला शिवसेनेने तीव्र विरोध केला. त्यानंतर कॅबिनेटमध्ये चर्चा करून समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची इच्छा शिवसेनेने व्यक्त केली. राज्यात अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यात शिवसेनेची दुटप्पी भूमिका दिसून येते. शिवसेनेने इतके वाभाडे काढूनसुद्धा भाजपा त्यांच्यासोबत जाते, यामध्ये दोघांची लाचारी दिसून येते.
शिवसेनेच्या बाबतीत अमित शहा व इतरांनी केलेली भाषणे पाहता सर्वसामान्यांनाही यांच्या युतीबद्दल धक्का बसला आहे. सत्तेसाठी हपापलेली शिवसेना इतका अपमान झाल्यावरही भाजपासोबत जाते. केवळ स्वत:चे अस्तित्व टिकविण्याची वेळ आल्याने सत्तेसाठी शिवसेना लाचार होताना दिसत आहे.
मित्रपक्षांबरोबर काँग्रेसची आघाडी मात्र फक्त लोकसभेपुरती होणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. आघाडीच्या जागावाटपाचे चित्र येत्या आठवड्यात स्पष्ट होईल. काँग्रेस मित्र आघाडी पक्षाची पहिली प्रचार सभा २0 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता नांदेड येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे -पाटील, शेकापचे जयंत पाटील, पीपल रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी परळी व २४ फेब्रुवारी रोजी लातूर येथे सभा होणार आहे. या दिवशी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
मनसेबरोबर आघाडी नाही- मनसेबरोबर आघाडीचा काँग्रेसचा प्रस्ताव नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.काँग्रेस व मनसेचे तात्त्विक मतभेद आहेत ते दूर झालेले नाहीत. मुंबईचा मनसेचा इतिहास पाहता आपण आघाडीबाबत अजिबात उत्सुक नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी मनसेबाबत आघाडीचे वक्तव्य केले होते आम्ही त्याला होकार कळविलेला नाही.