सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील शिंदेसेनेचे नेते संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवार, ५ एप्रिल रोजी कोकाटे यांचा पक्ष प्रवेश हाेईल, असे पवार गटाचे प्रदेश निरीक्षक शेखर माने यांनी सांगितले.
भाजपने माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर संजय कोकाटे यांनी शिंदेसेनेच्या लोकसभा प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. आम्ही भाजपच्या उमेदवाराचे काम करणार नाही, असे कोकाटे म्हणाले होते. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याचे संकेत दिले. अखेर हा पक्ष प्रवेश निश्चित झाला आहे.
संजय कोकाटे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे विजयी झाले. परंतु, कोकाटे यांना ७४ हजार ३२८ मते मिळाली होती. शिवसेना शिंदे गटाने त्यांच्यावर माढा लोकसभेची जबाबदारी सोपविली होती. कोकाटे यांनी माढ्यातून तयारी सुरू केली होती. मात्र यादरम्यान भाजपची उमेदवारी जाहीर झाली.