सोलापूर : गळीत हंगामाच्या काळात ऊसाची वाहतूक करताना निष्काळजीपणा अनेकांच्या जीवावर बेततो. गेल्या पाच वर्षांत हाच निष्काळजीपणा जिल्ह्यातील १२३ निष्पापांचा बळी घेणारा ठरला. ऊस वाहतूक ट्रॅक्टराच्या पाठीमागे रिफ्लेक्टर नसल्याने आणि ट्रॅक्टरच्या चाकाखाली ठेवलेले दगड रस्त्यावरच पडल्याने अनेक अपघात घडले आहेत. साखर उद्योगातील बेफिकिरीही या घटनांसाठी तितकीच कारणीभूत असू शकते.
दरवर्षी ऊस वाहतुकीसाठी बीड, परभणी, अहमदनगर आणि नांदेड या चार जिल्ह्यांतून हजारो वाहने सोलापूर जिल्ह्यात येतात. त्यांच्यासोबत हजारो शेतमजूर, ऊसतोडणी कामगार, ठेकेदार, वाहन धारक, चालक असा लवाजमा असतो. ही ऊस तोडणीसाठी आलेली वाहतूक आणि तोडणी यंत्रणा जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असते. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची संपूर्ण जबाबदारी याच यंत्रणेवर असते. मात्र, वाहतुकीतील निष्काळजीपणामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो.
पूर्वी जवळच्या वाहतुकीसाठी बैलगाडी आणि दूरच्या वाहतुकीसाठी ट्रकचा वापर केला जात होता. ऊस तोडणी कामगार आणि वाहतूक यंत्रणा त्या काळी मर्यादित होती. गेल्या आठ वर्षांत जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या तुलनेत तोडणी कामगार आणि वाहतूक करणारी वाहने कैकपटीने वाढली. बैलगाड्यांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. ट्रकवाहतूक कमी झाली. वाढत्या संख्येमुळे ट्रॅक्टरच्या वाहतुकीचे अनेक बळी ठरत आहेत .
रस्त्यावरचे दगड जीवघेणे
ऊसाची वाहतूक करताना एका ट्रॅक्टरला २ ट्रेलर जोडले जातात. या दोन्ही ट्रेलरमध्ये प्रत्येकी किमान दहा ते अकरा टन ऊस भरला जातो. वाहन रस्त्यावर चालताना समोर चढ आला तर वाहनाची क्षमता कमी पडते. वाहन थांबवतात आणि चाकाखाली तात्पुरता दगड ठेवतात. किरकोळ बिघाडाच्यावेळी वाहन जागेवर थांबते. नंतर पुढे जाताना रस्त्यांवर ठेवलेले चाकाखालील दगड बाजूला न काढता तसेच निघून जातात. दगड जागेवर तसेच राहिल्याने रात्रीच्या वेळी अनेक वाहनधारक जीवाला मुकतात.
रिफ्लेकटरचा अभाव
बैलगाडी अथवा अथवा ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रात्रीच्या वेळी रस्त्यात बंद पडतात. अशावेळी पाठीमागून येणाऱ्या वाहनांना ते स्पष्ट दिसण्यासाठी पाठीमागील बाजूंस रिफ्लेक्टर लावणे आवश्यक आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे अनेकदा दुचाकीस्वार अथवा अन्य वाहने त्यावर येऊन आदळतात. त्यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी आहे. महामार्गावर असे अपघात अधिक होतात.
ओव्हरटेक करताना लांबी नडते
एका ट्रॅक्टरला दोन अथवा कधीकधी तीन ट्रेलर जोडून उसाची वाहतूक केली जाते. रस्त्यावरून जाताना ओव्हरटेक करणाऱ्या वेगवान वाहनांना ट्रेलरची ही लांबी अडचणीची ठरते . वळणं घेत रस्त्यांवरून जातांना चालकाचे त्यावर नियंत्रण नसते. इतर वाहनांना कट बसल्याने अपघात होतात.या लांबीवर नियंत्रण असणे आवश्यक आहे.