मोहोळ : दुसऱ्या टप्प्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच मोहोळ तालुक्यात ही रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान दोन दिवसांमध्ये मोहोळ पोलिस स्टेशनमधील तुरुंगात असणारे तब्बल १३ आरोपी कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून त्यांच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या तीन चार महिन्यामध्ये थंडावलेली कोरोना रुग्णांची संख्या मोहोळ तालुक्यात पुन्हा वाढत असून मोहोळ ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी म्हणून नेण्यात आलेल्या चार आरोपींची कोरोना चाचणी सोमवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर मंगळवारी पुन्हा तुरुंगातील उर्वरित आरोपींची कोरोना तपासणी केल्यानंतर यातील दहा आरोपींची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून एकूण मोहोळ पोलीस ठाण्यातील एकूण १३ आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे शासकीय कार्यालय परिसर कोरोनापासून धोक्याची घंटा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
दरम्यान त्यांना तात्काळ सोलापुरातील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले असून जेलसह पोलीस स्टेशन परिसर स्वच्छता करून सॅनिटायझर करून घेतला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली आहे.