सोलापूर : आॅगस्ट महिन्यात आजपर्यंत कोरोनाचा संसर्ग शहरात कमी तर ग्रामीण भागात वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या १९ दिवसात ग्रामीणमध्ये १३४ तर सोलापुरात फक्त २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जुलै व आॅगस्ट महिन्यात बार्शी, पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यात कोरोना संसर्गाची चिंता वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
ग्रामीण भागात १५ एप्रिलपर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता. त्यानंतर या महिनाअखेर दोन रुग्ण आढळले, मे महिन्यात ही संख्या ३८ वर गेली. त्यानंतर जून महिन्यात संसर्गात वाढ झाली. या महिन्यात ३२१ आणि जुलै महिन्यात तब्बल ३ हजार २९२ रुग्ण वाढले. आॅगस्ट महिन्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख चढत्या क्रमाने रहिला. १८ दिवसात ४ हजार ४६९ रुग्ण आढळले आहेत. हीच स्थिती कोरोनाने मृत्यू होणाºया रुग्णांची राहिली आहे. एप्रिलमध्ये केवळ एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर मे मध्ये :४, जून: १३, जुलै: ८५, आॅगस्ट: १२६ अशा २२९ जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.
कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर मे, जून व जुलै महिन्यात सोलापूर शहरात संसर्ग वाढला होता. मृत्यूचे प्रमाण चिंताजनक झाले होते. जुलैच्या मध्यानंतर स्थिती बदलत गेल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात १२ एप्रिलला पहिला रुग्ण आढळला. त्यावेळी झालेल्या चाचण्यांच्या मानाने पॉझिटिव्हचा दर होता फक्त ६.१७ टक्के, मे महिन्यात हा दर १२.६४ तर जूनमध्ये २५.८७ वर गेला. पुन्हा जुलै महिन्यात हा दर ११.९८ झाला तर आॅगस्ट महिन्यात केवळ ७.७७ टक्क्यांवर आला आहे. ही स्थिती मृत्यूदराची आहे. एप्रिलमध्ये शहराचा मृत्यूदर ५.७१ टक्के होता, तो मे मध्ये १०.४६ व जूनमध्ये ११.४६ वर गेला. आता जुलैनंतर मृत्यूदर ४.२६ टक्के तर आॅगस्टमध्ये २.१८ टक्क्यांवर आला आहे. तर याउलट आता ग्रामीणचा मृत्यूदर २.८३ टक्क्यांवर गेला आहे.