सोलापूर : नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये बी. एड. व डी. एड. कॉलेजची फेररचना होणार आहे. त्यामुळे राज्यातील ६३४ डी.एड. महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यात ९५ अनुदानित महाविद्यालय, १६ शासकीय आणि उर्वरित विनाअनुदानित महाविद्यालयांचा समावेश आहे.
मुलांना आपल्या आवडीनुसार शिकता यावे, यानुसार शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आले आहे. ६३४ महाविद्यालयांतून जवळपास ६० हजार प्राध्यापक आणि कर्मचाºयांचा प्रश्न उद्भवणार आहे. यामुळे या सर्व डी. एड. विद्यालयांमध्ये एकात्मिक बी. एड. सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी व तेथील प्राध्यापकांना बी. एड. विद्यालयामध्ये समाविष्ट करून घेण्याची मागणी प्राध्यापक आणि विविध संघटनांकडून करण्यात येत आहे.
पदवीनंतर बी. एड. पूर्वी १ वर्षाचे होते. यात वर्मा कमिटीनुसार बदल करण्यात आले आणि आता सध्या २ वर्षांचे बी. एड. अभ्यासक्रम सुरू आहे तर डी. एड. अभ्यासक्रम २ वर्षाचे आहे; पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बदलामुळे आता चार वर्षांचे बी. एड. अभ्यासक्रम असणार आहे. त्याचे नाव चार वर्षांचे एकात्मिक बीएड असणार आहे. हे शिक्षक प्राथमिक वर्गाला शिकवणार आहेत. यानंतर माध्यमिकमध्ये अध्यापन करण्यासाठी त्या शिक्षकांना २ वर्षांचे बी. एड. करावे लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचाही दोन वर्षांच्या डी. एड.ऐवजी चार वर्षांच्या बीएड करण्याकडे जास्त ओढा निर्माण होत आहे. राज्यातील ६३४ महाविद्यालयांना एकात्मिक बी.ए.,बी.एड. अभ्यासक्रमांची परवानगी द्यावी, असे स्टेट टीचर एज्युकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशम कोल्हे यांनी म्हटले आहे.