सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झालेले घरकूल बांधण्यासाठी जिल्ह्यातील ५० हजार लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यातील दोन हजार जणांनी पंधरा हजारांचा पहिला हप्ता उचलून घर बांधलेलेच नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्यात येत आहेत. पण लाभार्थीच जागेवर सापडत नसल्याने भाऊसाहेबांना वरिष्ठांची बोलणी खावी लागत आहेत.
सन २०१५-१६ मध्ये झालेल्या सर्वेक्षणावरून जिल्ह्यातील ५० हजार ७२ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर करण्यात आले होते. पण तपासणीत नियमात न बसणारी ६ हजार १६३ जणांची नावे वगळली गेली तर मंजूर यादीतील ८३३ जण स्थलांतरित झाल्याचे आढळले. ७ हजार ५५८ जणांकडे जागा नव्हती. १ हजार २० जणांना इतर योजनांचा लाभ देऊन जागा देण्यात आली आहे. पण अजूनही ६ हजार ५३८ जणांकडे घर बांधण्यासाठी जागा नाही. सन २०२१ अखेर यातील ३६ हजार ५९८ घरकुले मंजूर आहेत, त्यापैकी ३५ हजार ६४५ जणांना घर बांधण्यासाठी पहिला हप्ता म्हणून पंधरा हजार अनुदान बँक खात्यावर जमा केले आहे. पहिला हप्ता जमा करूनही सुमारे दोन हजार लाभार्थ्यांनी जागेवर वीटसुद्धा आणली नसल्याचे दिसून आले आहे. अशा लाभार्थ्यांना घराची गरज दिसत नाही, त्यामुळे त्यांना दिलेले अनुदान परत वसूल करावे अशा वरिष्ठांनी सूचना दिल्याने ग्रामसेवक अर्थात भाऊसाहेब अशांचा शोध घेताना दिसत आहेत. पण अशी मंडळी जागेवर सापडतच नसल्याने भाऊसाहेबांना वरिष्ठांची बोलणी खावी लागत आहेत.
पाच वर्षांत दोन हजार लाभार्थी
०प्रधानमंत्री आवास योजनेतून ५० हजार लाभार्थ्यांना घरकूल योजना मंजूर करण्यात आली. यातील सुमारे दोन हजार लाभार्थ्यांना घर बांधणीसाठी पहिला हप्ता जमा करण्यात आला. लाभार्थ्यांनी खात्यावरील पैसे काढून इतर कामासाठी खर्च केले पण बांधकामास सुरुवात केली नाही. त्यामुळे त्यांना दुसरा हप्ता जमा केला नाही. ज्यांनी घर बांधले नाही अशांकडून बऱ्याच ग्रामसेवकांनी पैसे वसूल केले आहेत.
पाच टप्प्यात अनुदान
- ०प्रधानमंत्री आवास याेजनेतून घरबांधणीसाठी १ लाख २० हजारांचे अनुदान दिले जाते. लाभार्थ्यांनी यातून २६९ स्क्वे. फुटाचे पत्र्याचे घर बांधणे अपेक्षित आहे. बरेच लाभार्थी आपल्याजवळील काही हिस्सा घालून यापेक्षा मोठे घर बांधतात.
- ०त्याचबरोबर शौचालय बांधणीसाठी २० हजार व रोजगार हमी योजनेचे १८ हजार मंजूर केले जातात. पहिला हप्ता १५ ते २५ हजार दिल्यावर पायाभरणी व त्यानंतर टेलपर्यंत बांधकाम करण्यासाठी ४५ हजार, नंतर पत्रे घालण्यासाठी ४० हजार व शेवटी इतर कामासाठी २० हजारांचा हप्ता दिला जातो.
आम्हाला घरकूल मंजूर झाले होते. पण जागेची अडचण आली. भावकीतील वादामुळे घरबांधणीस मुदतवाढ मागितली. दोन वर्षांची मुदतवाढ ग्रामपंचायतीने दिली पण वाद मिटला नसल्याने घर बांधता आले नाही. त्यामुळे पैसे परत केले.
रमेश कटकधोंड, लाभार्थी
घरकूल मंजूर झाल्यावर बांधकामासाठी वाळू व इतर साहित्याच्या अडचणी आल्या. त्यामुळे वेळेत बांधकाम होऊ शकले नाही. त्यानंतर बांधकाम प्रलंबित पडले. काम न झाल्याने ग्रामपंचायतीने अनुदान परत मागितल्याने पैसे जमा केले.
भिवा शेंडगे, लाभार्थी
घरकुलासाठी मिळतो विविध योजनेतून लाभ
राज्य पुरस्कृत आवास योजनेतून १५ हजार २५१ घरकुले मंजूर करण्यात आली. यातील १४ हजार ९४५ जणांना पहिला हप्ता दिला. १२ हजार ७२५ जणांनी घरकुले बांधून पूर्ण केली आहेत अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी दिली. रमाई आवास योजनेतून मागासवर्गीयांना १४ हजार ४४९ घरकुले मंजूर करण्यात आली. त्यातील १४ हजार १६४ जणांना पहिला हप्ता देण्यात आला. १२ हजार ६ घरकुले पूर्ण झाली आहेत. शबरी आवास योजनेंतर्गत ५८० घरे मंजूर करण्यात आली. यातील ५७० जणांना पहिला हप्ता देण्यात आला. ५२९ जणांनी घरकुले पूर्ण केली आहेत. पारधी आवास योजनेतून २०२ घरकुले मंजूर करण्यात आली. २०१ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला. १९० जणांचे घरकूल पूर्ण झाले आहे.