सोलापूर : मड्डी वस्ती येथील ड्रेनेजच्या खड्ड्यांत काम करताना अंगावर माती पडल्याने आत काम करणाऱ्या मजुराचा गुदमरून मृत्यू झाला. गुलाबराव धनसिंग राठोड (वय ५२, तिऱ्हे तांडा, उत्तर सोलापूर) असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
मड्डी वस्ती येथे महानगरपालिकेच्या झोन कार्यालय क्रमांक दोनकडून ड्रेनेजचे काम सुरू होते. त्यात गुलाबराव राठोड हे काम करीत होते. शनिवारी गुलाबराव हे दत्त मंदिरासमोर ड्रेनेजमधील काम करण्यासाठी चेंबरमध्ये उतरले. यावेळी काम करीत असलेल्या जेसीबीमधून माती आणि दगड त्या खड्ड्यांतील गुलाबराव यांच्या अंगावर पडली. त्यात ते गुदमरून बेशुद्ध झाले. ही घटना तेथे उपस्थित असलेले त्यांचे बंधू चंदू राठोड आणि त्यांचा मुलगा रवी यांनी पाहिले. त्यांनी आरडा ओरड करण्यास सुरुवात करीत त्यांना तत्काळ बाहेर काढून उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले; पण डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
मृतदेह ताब्यात घेणार नाही, नातेवाइकांचा आक्रोश
पुन्हा एकदा मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. यामुळे जोपर्यंत संबंधित दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका प्रहार जनशक्ती पक्षाचे जमीर शेख आणि मृताच्या नातेवाइकांनी दिला आहे.
निवडणुकीची घाई जिवावर बेतली
झोन क्रमांक दोनच्या माध्यमातून ड्रेनेजलाईनचे काम हाती घेण्यात आले होते. त्याची कंत्राटदार केदार अंबादास शिंदे यांना वर्कऑर्डर देण्यात आली नव्हती. महापालिका निवडणूक तोंडावर आल्याने त्वरित काम करण्याचा या भागातील काही नगरसेवकांनी रेटा लावला होता. त्यामुळे ठेकेदाराने वर्क ऑर्डर न घेताच काम सुरू केले होते, असे महापालिकेच्या अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.
ड्रेनेजचे काम करीत असताना जेसीबी चालकाने वरून माती टाकल्यामुळे माझे भाऊजी आत अडकले. यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या कुटुंबाचा आधार गेला आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
बंडू पवार, मृताचे नातेवाईक