मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे
दसरा सणानिमित्त पूजेसाठी फुले आणण्यासाठी निघालेल्या माजी उपसरपंच सुनील उर्फ पप्पू पाटील यांना क्रेन चालकाने धडक दिल्याने त्याखाली चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी ११ वाजता माचनूर चौकात घडली. यामध्ये एक जणाला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेने विजया दशमीच्या सणादिवशी ब्रह्मपुरी गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन संतप्त ग्रामस्थांच्या भावना समजून घेऊन शांततापूर्वक परिस्थिती हाताळली.
ब्रह्मपुरी येथील माजी उपसरपंच सुनील उर्फ पप्पू पाटील( वय ४५) व राजेंद्र दगडू पुजारी ( वय ५१) हे दोघे दसरा सणानिमित्त पूजेसाठी फुले आणावयास बेगमपूर येथे निघाले होते. यावेळी माचनूर चौकातून बेगमपूरकडे निघालेल्या क्रेनचा धक्का लागून जागेवर दोघेही पडले. यावेळी अपघात झाल्याने क्रेनचालक घाबरून पळून जात असताना क्रेनचे टायर डोक्यावरून जाऊन माजी उपसरपंच पप्पू पाटील जागीच मयत झाले. यामध्ये गाडी चालवणारे राजेंद्र दगडू पुजारी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेने जमाव संतप्त झाला होता. क्रेनचालकाच्या बिफिकरीमुळे उपसरपंच सुनील उर्फ पप्पू पाटील यांना जीवाला मुकावे लागले आहे. बेगमपूर न्यू इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक सुरेश पाटील यांचे ते चिरंजीव होते. सुनील पाटील यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी , आई , वडील , दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. या अपघातात बचावलेले राजेंद्र पुजारी हे दामाजी साखर कारखान्यात सुरक्षा रक्षक आहेत.