सोलापूर: पतीने केलेल्या मानसिक छळ आणि मारहाणीतून पेटवून घेतलेल्या विवाहित महिलेचे प्रेत उकरुन शुक्रवारी शवविच्छेदन करण्यात आले. रईसा गफूर शेख (वय ३२, रा. मोदीखाना, सोलापूर) असे मयतेचे नाव आहे. मयतेच्या नातलगांच्या विनंतीवरुन मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी हे प्रेत उकरण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सूत्रांनुसार, यातील मयत रईसा गफूर शेख हिचा पेशाने वकील असलेल्या गफूर शेख याच्याशी २८ मार्च २००९ रोजी प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या काही कालावधीनंतर पती-पत्नीची किरकोळ कारणावरुन भांडणे होऊ लागली. वेळोवेळी मारहाणही सुरु झाली. वडिलांकडून अडीच लाख रुपये हुंडा आणण्यासाठी आणि आईच्या नावावर असलेले घर नावावर करण्यासाठी तगादा लावला. शेवटी रईसाच्या वडिलांनी मुलीचा संसार सुखी व्हावा म्हणून अडीच लाख रुपयेही दिले. यानंतरही मारहाण सुरुच होती. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून रईसाने ११ नोव्हेंबर २०१८ रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.
गंभीर भाजलेल्या रईसाला सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. घरी आल्यावर एक महिन्याने ३ डिसेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. तिच्या नातलगांनी मोदी कब्रस्तान येथे दफनविधी केला. यानंतर मयताच्या नातेवाईकांनी मोदी पोलीस ठाण्यामध्ये रईसाचा मृत्यू झाल्याचे सांगून तिच्या मृत्यूचे कारण कळावे म्हणून पोलिसांकडे विनंती केली. यावरुन पोलिसांनी शुक्रवारी दुपारी १२ वाजता मोदी कब्रस्तान येथे वैद्यकीय अधिकारी विनोद राठोड, नातेवाईकांसमक्ष तिचा मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. येथे सायंकाळी रईसाच्या मृतदेहाचे विच्छेदन केले. वैद्यकीय अहवालानंतर तिचे कारण स्पष्ट होईल, असे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.
मृत्यूच्या कारणासाठी केले पोस्टमार्टेम- मयत रईसा आणि आरोपी गफूर शेख यांचा प्रेमविवाह झालेला होता त्यामुळे ते स्वतंत्र राहत होते. लग्नांच्या काही दिवसानंतर दोघांमध्य कुरबूर होऊन भांडणे व्हायची. यातूनच रईसाने मनस्ताप सहन न झाल्याने पेटवून घेतले. माहेरच्या लोकांनी तिच्यावर रुग्णालयात उपचार करुन घरी आणल्यानतर तिचा मृत्यू झाला. मात्र संबंधित प्रकार हा पतीने दिलेल्या त्रासामुळेच रईसाचा मृत्यू झाला असून, तिच्या मृत्यूचे कारण समजण्यासाठी सात दिवसानंतर पोस्टमार्टेम करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.