सोलापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्याचा परिणाम रक्तपेढ्यांवर दिसून येत आहे. शासन तसेच रक्तपेढ्यांनी आवाहन केल्यानंतर काही युवकांनी स्वयंस्फूर्तपणे ब्लड बँकेत जावून रक्तदान करण्याची मोहीम चालवली. परंतु, ही मोहीम पुरेशी ठरली नाही. आजघडीला जवळपास सर्वच रक्तपेढ्यांमध्ये तुरळक प्रमाणात रक्तसाठा आहे.
कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत ४५ वर्षांवरील सर्वांनाच लसीकरण सुरू झाले. ज्यांनी लस घेतली अशांना २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येत नसल्याने त्याचाही परिणाम रक्त संकलनावर होऊ लागला. त्यामुळे सद्यस्थितीत आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा जिल्ह्यातील प्रमुख रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती रक्तपेढ्यांकडून मिळाली.
शासकीय रक्तपेढीतही तुटवडा
मार्च महिन्यात जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक रक्तदाते स्वत:हून रक्तदान करण्यास टाळत असल्याचे दिसत आहे. शासकीय रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे घेण्यात येत असल्याने काही प्रमाणात रक्ताचा साठा उपलब्ध आहे. मात्र, हा साठा जास्त दिवस पुरणार नाही. त्यामुळे अधिकाधिक शिबिरे घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
रोज १०० रक्तदात्याना विनंती
दमाणी रक्तपेढीतही रक्ताचा तुटवडा आहे. रुग्णांची गरज भागविण्यासाठी रोज १०० दात्यांना फोन करून रक्त देण्यासाठी आवाहन केले जाते. यातील फक्त चार ते पाचजण तयार होत आहेत. थैलेसिमियाग्रस्त मुलांना रक्त देणेही यामुळे मुश्कील झाले आहे.
डॉ. हेडगेवार रक्तपेढी
दिवसेंदिवस रक्ताची गरज वाढत असून, रक्तसाठा मात्र मर्यादित आहे. पुढील आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा सध्या रक्तपेढीमध्ये आहे. आमच्याकडे दत्तक असलेली १२५ थैलेसिमियाग्रस्त मुले आहेत. त्यांच्यासाठीही रक्ताची तजवीज करायची आहे. या परिस्थितीमध्ये फक्त नागरिकच रक्तदान करून हे संकट परतवू शकतात, असे डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पटणे यांनी सांगितले.
गोपाबाई दमाणी रक्तपेढी
कोरोनाची दुसरी लाट, उन्हाळा, शाळा व महाविद्यालय बंद असणे, कार्यालयात मर्यादित उपस्थिती याचा थेट परिणाम रक्तदानावर होत आहे. त्यातच लसीकरण झाल्यानंतर २८ दिवसाने रक्तदान करण्यासाठी सांगण्यात आले आहे. यामुळे रक्ताचा खूप मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. नेहमीप्रमाणे सोलापूरकर हे या वाईट परिस्थितीतही रक्तदान करून सहकार्य करतील, अशी अपेक्षा गोपाबाई दमाणी रक्तपेढीचे प्रशासकीय अधिकारी अशोक नावरे यांनी व्यक्त केली.
लस घेण्यापूर्वी करा रक्तदान
रक्ताची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. या परिस्थितीत रक्त संकलनाचे प्रमाण अत्यल्प आहे. महाविद्यालये बंद असल्याने शिबिर खूप कमी प्रमाणात आयोजित होत आहेत. सुरुवातीला कोरोना त्यात आता कोरोनाची लस घेणाऱ्या व्यक्तीला लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. अशात येथील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. दात्यांनी रक्तदान करून त्यानंतरच लस घ्यावी, असे आवाहन रक्तपेढीकडून करण्यात आले आहे.