करमाळा : दारू पिऊन दमदाटी व शिवीगाळ करीत असल्याने वैतागलेल्या भावाने सख्ख्या भावास झोपल्या जागेवर दोरीने गळफास लावून ठार मारले. त्यानंतर त्याचे प्रेत पोत्यात बांधून सावडी (ता.करमाळा) येथील शिवारात आणून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याच्यावर पेट्रोल ओतून जाळले.
करमाळा तालुक्यातील सावडी शिवारात काशिनाथ गोडसे यांच्या शेतात ४० ते ४५ वर्षे वयाच्या अज्ञात व्यक्तीचा खून करून अर्धवट जाळून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचे प्रेत टाकून देण्याचा प्रकार २६ फेब्रुवारीला घडला होता. या प्रकरणी पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि ३०२ चा गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळावर मिळालेल्या साईनाथ कंपनीच्या पाण्याच्या बाटलीवरील लेबलवरून पोलिसांनी कडा आष्टी (जि.बीड) या ठिकाणी तपास सुरू केला.
गुन्ह्याच्या घटनास्थळावर येण्यासाठी पश्चिमेस एक कि. मी. अंतरावर अहमदनगर जिल्ह्याची सीमा आहे. मयताची ओळख पटविण्यासाठी परिसरातील राशीन, करपडी, खेड, सावडी या भागात पोलिसांनी विचारणा करून कोर्टी येथे असताना चिलवडी (ता.कर्जत, जि.अहमदनगर) येथील इसम दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी चिलवडी येथे जाऊन मयताचे फोटो गावात दाखवले असता मयत यशवंत रामभाऊ घोडके असल्याची ओळख त्याचा भाऊ संतोष रामभाऊ घोडके (रा.चिलवडी) याने सांगितली.
पोलिसांनी गुन्ह्याच्या संदर्भात चौकशी केली असता सुभाष एकाड, सुखदेव भराटे (रा.सावडी, ता.करमाळा) त्यांच्या वस्तीपासून थोड्या अंतरावर २६ फेब्रुवारी रोजी गुन्ह्याच्या ठिकाणी लाईट बंद असलेल्या मोटरसायकलचा आवाज आला होता व गोडसे यांच्या शेतात काहीतरी जळत असल्याचे पाहिले होते. त्यानुसार मयताचे भाऊ सुखदेव व संतोष यांच्याकडे चौकशी करीत असताना सुखदेव यांच्या घरी मोटरसायकल असल्याचे दिसली.
पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बजरंग बोराटे, पोलीस नाईक प्रदीप पर्वते,पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण साठे,मंगेश पवार,समीर खैरे,योगेश चितळे यांनी गुन्ह्यामधील साक्षीदार सुभाष एकाड, सुखदेव भराटे (रा. सावडी, ता. करमाळा) यांच्याकडे चौकशी करून ही कारवाई केली. या घटनेचा तपास लागल्यानंतर सावडी येथील ग्रामस्थांना एकच धक्का बसला.
झोपेच्या ठिकाणीच आवळला फास- त्या मोटरसायकलच्या वर्णनावरून सुखदेव रामभाऊ घोडके यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता यशवंत यास दारूचे व्यसन होते. दारू पिऊन तो नियमित शिवीगाळ, दमदाटी करीत असे. त्याला घाबरून सुखदेवची मुले व बायको दार बंद करून घरात बसत होते. त्यास वैतागल्याने सुखदेव याने २६ फेब्रुवारी रोजी रात्री ७.३० वा. यशवंत यास झोपेच्या ठिकाणीच दोरीने गळफास देऊन ठार मारले व त्याची ओळख पटू नये म्हणून त्याचे प्रेत पांढºया गोणीत बांधून सावडी शिवारात आणून त्यावर पेट्रोल ओतून जाळले. पोलिसांनी चोवीस तासाच्या आतमध्ये अज्ञात मयताची ओळख पटविली व नंतर गुन्ह्याचा तपास लावला.