सोलापूर : अवघ्या पाचशे रुपयांसाठी भावाने सख्ख्या भावाला दगडाने मारून गंभीर जखमी केले. ही घटना बीबीदारफळ (ता.उ. सोलापूर) येथे २२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान, नेताजी लक्ष्मण मोरे (वय ५०, रा. बीबीदारफळ, ता. उ. सोलापूर) यानी दिलेल्या फिर्यादीनुसार तानाजी लक्ष्मण मोरे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता बीएनएस ११५ (२), ११८ (१), ३५१ (२), ३५२ नुसार सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, २२ मार्च २०२५ रोजी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे शेतात काम करून हात-पाय धुवत असताना फिर्यादीचा भाऊ हा तेथे आला. त्याला फिर्यादीने दोघांच्या शेतामधील समाईकमध्ये बसविलेले महावितरणच्या पोलचे पैसे दे असे म्हणाल्यावर मी पैसे देत नाही, तुला काय करायचे आहे ते कर असे म्हणून शिवीगाळ केली. याचवेळी शर्टाला धरून दगडाने डोक्यात मारून जखमी केले.
दरम्यान, या घटनेची नोंद सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात झाले असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल महिंद्रकर हे करीत आहेत. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही. जखमी फिर्यादीवर रुग्णालयात उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.