सांगोला : घेरडी (ता. सांगोला) येथील बैलगाडी शर्यतीची घटना ताजी असताना पुन्हा तालुक्यातील उदनवाडी येथे बैल व घोडागाडी शर्यतीचा सराव व शर्यत लावण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार १९ रोजी उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हा सराव व शर्यत चक्क कोंबडी पार्टी होणार होती, परंतू पोलिसांना कुणकुण लागल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले.
सर्वोच्च न्यायालयाकडून बैलजोडी व घोडाजोडी शर्यतीच्या स्पर्धा अगर शर्यत घेण्यास प्रतिबंध केला असताना लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात उदनवाडी, बुद्धेहाळ व झापाचीवाडी ता.सांगोला येथील 6 जणांसह इतर इसमानी मिळून उदनवाडी गावाच्या बुध्देहाळ कॅनॉल शेजारी शेतातील मोकळ्या शिवारात पाच बैल व घोडाजोडी च्या गाड्या हातात चाबूक व काठ्या घेऊन सराव करण्याच्या तयारीत उभे होते.
दरम्यान या सराव व शर्यतीची गोपनीय माहिती पो.नि.राजेश गवळी यांना मिळाल्याने सपोनि प्रशांत हुले पो. ना. हजरत पठाण , पो. ना. नागेश निंबाळकर पो कॉ गणेश कुलकर्णी सदर ठिकाणी अचानक गेले असता पोलिसांना पाहून पळून जाणाºया विजय आलदर यास पकडले यावेळी सपोनि हुले यांनी त्याच्याकडे इतर साथीदारांची नावे विचारपूस केली असता धनाजी सरगर , साईनाथ सरगर , बापूराव सरगर व नवनाथ वलेकर (रा. उदनवाडी) व भिमराव लवटे (रा. बुद्धेहाळ ता. सांगोला) असल्याचे त्यांने सांगितले.
पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आम्ही सर्वजण मिळून बैल व घोडागाडी शर्यतीचा सराव करण्यासाठी व शर्यत लावण्याच्या उद्देशाने एकत्र आल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून शर्यतीच्या रिकाम्या गाड्या ताब्यात घेतल्या. याबाबत पो.ना हजरत पठाण यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी ६ जणांसह इतर इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.