आप्पासाहेब पाटील
सोलापूर : स्मार्टफोनचा वापर वाढला असतानाच करमणुकीचा भाग म्हणून रिल्स पाहण्याचा कल वाढला आहे. एवढेच नव्हे तर गेम, व्हिडिओ, फेसबुक, इन्स्टाग्राम पाहण्याकडेही लहान मुलांसोबतच तरुणांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम मुलांच्या आरोग्य होत आहे, परिणामी तरुणांमध्ये ब्रेन फॅग अर्थात मानसिक थकवा येण्याचे प्रमाण वाढले असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञ हर्षल थडसरे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले आहे.
मोबाइलवरील व्हिडिओ पाहून सर्व वयोगटातील लोकांना एक प्रकारचे व्यसन लागले आहे. या व्यसनामुळे पुन्हा पुन्हा मोबाइल पाहण्याची इच्छा निर्माण होऊ लागली आहे. हे आरोग्यासाठी घातक आहे. मोबाइलवर काय पाहावे...काय पाहू नये याबाबत पालकांनी मुलांना समजावून सांगण्याची आता खरी गरज आहे. शिवाय मोबाइलपासूर दूर ठेवण्यासाठी पालकांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
---------
मोबाइलच्या अतिवापरामुळे होणारे आजार
- - चिडचिडेपणा
- - हेकेखोरपणा
- - संशयाचे आजार
- - उदासीनता
- - डोळ्यांचे आजार
- - रात्रीचे जागरण वाढले
-------------
पालक अन् मुलांमध्ये वाद
मुलांना शांत बसण्यासाठी पालकच मुलांना मोबाइल देतात. त्यामुळे मोबाइलची सवय लहान मुलांमध्ये सर्वाधिक दिसून येत आहे. पालक कामावरून घरी येतात मोबाइल हिसकावून घेणे हाही प्रकार मुलांमध्ये वाढत आहे. दरम्यान, मोबाइलवरून पालक व मुलांमध्ये सातत्याने वाद होतानाचे चित्र अनेकदा समोर येते.
----------
मुलांना हे करायला सांगा
- - मोबाइलपासून दूर राहण्यास सांगा.
- - मैदानी खेळाकडे आकर्षित करा.
- - कॅरम, बुद्धिबळसारखे खेळात गुंतवा.
- - पुस्तक वाचनाची सवय लावा.
- - आई, वडिलांनी मुलांची जास्त वेळ गप्पा मारावे.
- - घरातील छोटी-छोटी कामे करण्यास सांगा.
----------
रात्री मोबाइलपासून दूर राहिलेलेच बरे
अनेक लहान व तरुण मुलं रात्री २ ते पहाटे ३ वाजेपर्यंत मोबाइलच्या स्क्रीनसमोर असतात. गेम, इन्स्टाग्राम, फेसबुकवरील व्हिडिओ पाहण्यात ते दंग असतात. त्यामुळे मुलांना व्यसन जडतं. या व्यसनामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे पालकांनी काळजीपूर्वक मुलांना रात्री मोबाइलपासून दूर राहण्यास भाग पाडावे, असेही आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हर्षल थडसरे यांनी केले आहे.
-----------
मोबाइल, टीव्ही व संगणकांच्या स्क्रीनच्या रेडिअेशनमुळे लहान मुलांसोबतच सर्व वयोगटांतील लाेकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. त्याबाबतचे रुग्णांची संख्याही वाढत आहे. इतर व्यसनामुळे जसे केमिकल असतात तसे मोबाइलमुळेही एक वेगळ्या प्रकारचे व्यसन लोकांच्या जिवावर बेतत आहे. हे सर्व टाळण्यासाठी सर्वांनी मोबाइलचा वापर कामापुरताच करायला हवा, अनावश्यक वापर टाळायला हवा.
- डॉ. हर्षल थडसरे, मानसोपचार तज्ज्ञ, सोलापूर