सोलापूर : आंबे काढण्यासाठी झाडावर चढलेल्या अकरा वर्षांच्या तरुणाला विद्युत वाहिनीचा धक्का बसला. यात अकरा वर्षांचा मुलगा गंभीरपणे भाजला गेला आहे. लाकडाच्या साहाय्याने नागरिकांनी त्याला विजेपासून दूर केले. रोशन जग्गू मनसावाले (रा. नळ बाजार चौक, लष्कर) असे भाजून गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रविवारी शाळेला सुटी असल्यामुळे रोशन हा अंत्रोळीकर नगर परिसरात राहत असलेल्या आजीकडे आला होता. रविवारी सकाळी दहा वाजता अंत्रोळीकर नगर येथील आंब्याच्या झाडावर चढून आंबे काढताना तेथील विद्युत डीपीचा त्याला शॉक लागला. यात तो हळूहळू भाजू लागला. ही घटना तेथील काही नागरिकांनी पाहिली. त्यांनी तत्काळ तेथील एका लाकडी बांबूने विद्युत वाहिनीपासून त्याला दूर केले.
दरम्यान, त्याचा डोक्याजवळचा अर्धा भाग, पाठीचा काही भाग व दोन्ही पाय भाजले. त्यात दोन्ही पाय काळे निळे पडले. पाठीला मात्र मोठे भगदाड पडले. शिवाय त्या भागाचा पूर्णपणे कोळसा झाल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. घटना घडताच त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्याची स्थिती सध्या गंभीर असून, डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. ही घटना कळताच त्याच्या नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली. त्याला एक भाऊ आणि आई, वडील असल्याची माहिती मनुसिंग बाबावाले यांनी दिली.