सोलापूर : सोलापूर शहरापासून अवघ्या पंचवीस किलोमीटरवर असलेल्या मंद्रुप येथे कोरोनाचा पहिला रुग्ण शनिवारी आढळला आहे. सोलापूर शहरानंतर आजूबाजूच्या परिसरात कोरोनाने पाय पसरायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा आरोग्य विभागाकडे सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेकडून शनिवारी दुपारी अहवाल प्राप्त झाले, त्यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप व कुंभारी परिसरातील विडी घरकुलमध्ये प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. मंद्रुपमध्ये कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली जात आहे़ जिल्हा प्रशासनाने दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिल्यानंतर गर्दी वाढू लागल्याने पुन्हा जनता संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान शनिवारी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे.
संबंधित रुग्ण जिल्हा कारागृहात पोलीस असल्याचे सांगण्यात आले, त्यांची पत्नी मंद्रुप येथे सेवेत असल्याने ते येथील पोलीस लाईन राहावयास आहेत. जिल्हा कारागृहातील कैदी व कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याने तपासणी करण्यात येत आहे, त्यामध्ये संबंधित कर्मचाºयांचा अहवाल शनिवारी जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. संबंधित कर्मचाºयाचा पत्ता मंद्रुप पोलीस लाईनचा असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पण चौकशीत हा कर्मचारी सोलापुरात सेवेला असून मंद्रुपवरून ये-जा करत असल्याचे समजल्यावर लोकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. मात्र हा अहवाल आल्यावर जिल्हा आरोग्य विभागाने खबरदारी घेतली आहे. मंद्रुप पोलीस लाईन येथील संबंधित पोलिसांचे घर तपासून जंतूनाशक फवारणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.