सोलापूर : साधारणपणे कामानिमित्त ३१ ते ५० वयोगटातील वर्गच घराबाहेर पडत असतो. त्यामुळे या वयोगटातील वर्गांमधील लोकांना कोरोना होण्याचा जास्त धोका आहे. शहरांमध्ये सर्वांत जास्त रुग्ण याच वयोगटातील आहेत. त्यामुळे ३१ ते ५० वयोगटातील व्यक्ती हे कोरोनाचे टार्गेट झाल्याचे दिसत आहे.
शाळा महाविद्यालय बंद असल्याने लहान मुले व तरुण बाहेर सहसा जात नाहीत. ज्येष्ठ नागरिक हे कामानिमित्त सहसा बाहेर पडत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात कोरोना होण्याचे प्रमाण कमी आहे. कमवता समजला जाणारा ३१ ते ५० वयोगटातील वर्ग हा तुलनेने अधिक कोरोनासंसर्गित होत आहे. शहरातील एकूण १४ हजार ४८७ रुग्णांपैकी ५१०५ रुग्ण हे ३१ ते ५० वयोगटातील आहेत. ० ते १५ वयोगटातील मुलांना सर्वांत कमी संसर्ग झाला आहे.
मृत्यूमध्ये ज्येष्ठ नागरिक जास्त
ज्येष्ठ नागरिकांना हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब उच्च रक्तदाब यांसारखे विकार असतात. त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना कोरोनाचा अधिक धोका असतो. शहरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. शहरात मृत्यू झालेला ६९२ नागरिकांपैकी ४२८ हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यानंतर ५१ ते ६० वयोगटातील नागरिकांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.
महिलांपेक्षा पुरुषांमध्ये संसर्गाचे प्रमाण जास्त
कोरोनाचा संसर्ग होण्यामध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त आहे. शहरात एकूण १४ हजार ४८७ कोरोना संसर्गित असून त्यांपैकी आठ हजार ५९६ पुरुष, तर पाच हजार ८९१ महिला आहेत. एकूण कोरोना संसर्गितांपैकी ५९.३४ टक्के पुरुष, तर ४०.६६ टक्के महिला आहेत.
- कोरोनाचे एकूण रुग्ण - १४४८७
- १५ वर्षांखालील - १०९९
- १६ ते ३० वयोगट - ३०२७
- ३१ ते ५० वयोगट - ५१०५
- ५१ ते ६० वयोगट - २४९४
- ६० वयापुढील - २७६२