सोलापूर : सापाला पकडण्याची माहिती नसताना एका तरुणाने धाडस केले. यात त्याला विषारी सापाने चावा घेतला. शेवटी सर्पमित्रानेच त्याला उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल केले.
आसरा चौक परिसरात मंगळवारी रात्री एक साप आढळला. तिथे एका १८ वर्षांच्या तरुणाने सर्पमित्राला न बोलवता, स्वत:च सापाला बाटलीत बंद करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान विषारी फुरसे सापाने त्या तरुणाचा चावा घेतला. सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी याची माहीती सर्पमित्र रवींद्र स्वामी यांना दिली. रवींद्र स्वामी यांनी घटनास्थळी गेल्यानंतर सापाची पाहणी केली. या पाहणीत चावा घेतलेला साप हा विषारी फुरसे असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी त्या तरुणास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. तरुणाला चावा घेतलेला साप हा विषारी फुरसे असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी परिस्थिती पाहून त्या तरुणावर अतिदक्षता विभागात उपचार केले. वेळेवर उपचार केल्याने या तरुणाची प्रकृती स्थिर आहे. एखादा सर्प आढळून आल्यास कोणत्याही प्रकारची माहिती व प्रशिक्षणाशिवाय त्या सापास पकडण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. सापावर दुरूनच लक्ष ठेवून सर्पमित्रांना फोन करून, या घटनेची माहिती द्यावी, असे आवाहन सर्पमित्रांनी केले.