सोलापूर : शहराला होणाºया चार दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे वापरासाठी ठेवलेल्या पाण्याच्या बादलीजवळ खेळत खेळत गेलेल्या दीड वर्षाच्या चिमुरडीचा आत पडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सकाळी ११ वाजता रविवार पेठ येथील घराजवळ घडली.
रविवार पेठ येथील मशीदसमोर नागेश जाधव यांचे घर आहे. नागेश जाधव यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. नागेश जाधव हे व्यवसायाने मिस्त्री कामगार असून, ते पत्नी रुपाली यांच्यासमवेत पत्र्याच्या घरात संसार करतात. रुपाली यांना श्रद्धा नावाची दीड वर्षाची मुलगी आहे. रविवारी नेहमीप्रमाणे नागेश सकाळी कामाला गेले, रुपाली या घरात स्वयंपाक करीत होत्या. घरासमोर आणखी काही मुले गोट्या खेळत होते. घरात असलेली श्रद्धा रांगत रांगत घराच्या बाहेर आली. रुपाली या स्वयंपाक करीत होत्या, बाहेर मुले आहेत त्यामुळे ती त्यांच्याजवळ जाऊन खेळेल असा समज करून आपले काम करीत होत्या. श्रद्धा घराच्या बाहेर गेली, थोडा वेळ अंगणात खेळली. अंगणातील इतर मुले टीव्हीवरील कार्टून पाहण्यासाठी निघून गेली.
श्रद्धा खेळत खेळत पुन्हा आपल्या घराकडे जात असताना तिला दारात असलेली प्लास्टिकच्या पाण्याची बादली दिसली. ती बादली जवळ गेली. बादलीला धरून ती उभी राहिली आतील पाणी पाहून ती हात घालून खेळू लागली. खेळता खेळता तिचा तोल गेला आणि तोंडाच्या बाजूने ती पाण्यात पडली. आजूबाजूला कोणी नसल्याने हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. आई रुपाली या स्वयंपाकाचे पाणी टाकण्यासाठी दारात आल्या तेव्हा मुलगी श्रद्धाचे दोन्ही पाय बादलीत वरच्या दिशेला दिसले. हातातील भांडे टाकून त्या बादलीजवळ गेल्या आणि श्रद्धाला बाहेर काढले. श्रद्धाच्या गालाला हात लावून तिला उठवण्याचा प्रयत्न केला; मात्र ती हालचाल करीत नव्हती. रुपाली यांनी तिला तत्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले, डॉक्टरांनी त्यांना मोठ्या खासगी रुग्णालयात जाण्यास सांगितले. रुपाली यांनी रुग्णालयात धाव घेतली असता तेथील डॉक्टरांनी श्रद्धाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याची नोंद जेलरोड पोलीस ठाण्यात झाली आहे.
माझी श्रद्धा...म्हणत आईने केला टाहो...- डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितल्यानंतर माझं बाळ.., माझं पिल्लू..., श्रद्धा हे काय झालं असा टाहो फोडत आई रुपाली रडू लागल्या. घटनेची माहिती कळताच आजूबाजूचे लोक पाहण्यासाठी आले. अचानक असं कसं झालं अशी चर्चा करीत श्रद्धाबद्दल हळहळ करू लागले.