सोलापूर : आंघोळीसाठी ठेवलेल्या गरम पाण्याच्या बादलीत पडून भाजल्याने तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. अजिंक्य भीमराव थोरबोले (वय ३, रा. शिंगोले, ता. मोहोळ) असे मयत बालकाचे नाव आहे. २५ जुलै रोजीच त्याचा तिसरा वाढदिवस त्यांच्या कुटुंबियांनी साजरा केला होता. पण वाढदिवसाच्या चौथ्या दिवशी त्याचा मृत्यू झाल्याने थोरबोले कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
१७ जुलै रोजी घरात भावासोबत खेळत असताना अजिंक्य हा तोल जाऊन आंघोळीसाठी ठेवलेल्या गरम पाण्याच्या बादलीमध्ये पडला. यात त्याचा पाठीपासून ते मांडीपर्यंतचा, पोटाचा व अवघड जागेचा भाग मोठ्या प्रमाणात भाजला. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी त्याला लगेच खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला काहीच दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, उपचार सुरू असतानाच आई-वडिलांनी २५ तारखेला त्याचा वाढदिवस हॉस्पिटलमध्येच केला होता. त्यानंतर अशी अनाहूत घटना घडेल, यावर आमचा विश्वास बसला नाही, असे मृत मुलाचे वडील भीमराव थोरबोले यांनी सांगितले.
शाळेला जाण्याची करत होता जिद्द
अजिंक्य हा अंगणवाडीमध्ये जात होता. तो शाळेला जाण्यासाठी नेहमी उत्सुक असायचा. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाही मला माझी पाटी, दप्तर आणून द्या. मला शाळेला जायचंय, असे तो म्हणत होता, अशी आठवण अजिंक्यचे वडील भीमराव थोरबोले यांनी सांगत ते रडू लागले.