सोलापूर: जिल्हा आरोग्य व मनपा आरोग्य विभागातर्फे शहर व ग्रामीणमधील मागील चोवीस तासातील कोरोनाग्रस्त व मृत्यूची आकडेवारी दररोज सायंकाळी प्रसिद्ध केली जाते. सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ३ हजार ५७० मृत्यूची नोंद आहे. पण प्रत्यक्षात पोर्टलवरील आकडेवारीवरून जाहीर केलेल्या बुलेटिनमध्ये ३ हजार ३४८ मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. आकडेवारीत २२२ मृत्यूची तफावत दिसत असून, आकडेवारी अपडेट झाल्यावर ही समस्या दूर होते असे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी महापालिकेच्या वेबसाईटवर कोरोनाने झालेले सुमारे ४७ मृत्यू नोंदलेच गेले नव्हते. याबाबत आरोग्य मंत्र्यापर्यंत तक्रार करण्यात आली. त्यानंतर तपासणी झाल्यावर महापालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून पोर्टलवर माहिती भरण्याचे राहून गेल्याचे दिसून आले. त्यानंतर ही चूक दुरुस्त करण्यात आली. आताही हीच परिस्थिती दिसत आहे. आरोग्य विभागाने जाहीर केलेली पॉझिटिव्ह रुग्ण व कोरोना मृतांचा आकडा पोर्टलवर कमी दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यावर पॉझिटिव्ह व मृतांची संख्या वाढत जाते. या काळात सर्वच रुग्णालयांकडून लवकर माहिती येत नाही. माहिती उपलब्ध होईल तसे पोर्टलवर भरण्यात येते. जाहीर प्रसिद्धीकरणासाठी मागील चोवीस तासातील आकडेवारी घेतली जाते. यातील मृत्यूची आकडेवारी रुग्णालये उशिरा कळवितात. त्यामुळे प्रसिद्धीकरणात मृत्यू झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी माहिती प्राप्त झाल्याचे दिसून येते. पण पोर्टलवर पॉझिटिव्ह आकडेवारी तातडीने भरली जाते. यामुळे आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीपेक्षा पोर्टलवर पॉझिटिव्ह, कोरोनामुक्त झालेले व उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या जादा दिसत आहे. मग मृत्यूची आकडेवारी कमी कशी दिसते असा सवाल उपस्थित होत आहे.
सर्वाधिक बळी ग्रामीणमध्ये
१७ मेच्या आकडेवारीनुसार शहरात १ हजार ३११ तर ग्रामीणमध्ये २ हजार २५९ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. पॉझिटिव्ह: १ लाख ३४ हजार ७७० तर ॲक्टिव्ह: १७ हजार ८१८ व कोरोनामुक्त १ लाख १३ हजार २५६ रुग्ण असल्याचे जाहीर केले आहे. पण पोर्टलवर सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रसिद्ध केेलेल्या बुलेटिनमध्ये मृत्यू ३ हजार ३४८, पॉझिटिव्ह: १ लाख ४१ हजार १२८, उपचार घेणारे २० हजार ९७८ तर कोरोनामुक्त १ लाख १६ हजार ७३९ रुग्ण दाखविले आहेत. सर्वच आकडेवारीत तफावत दिसत आहे.
ही पहा आकडेवारीतील तफावत...
जिल्ह्यातील एकूण कोरोना मृत्यू: ३५७०
पोर्टलवरील नोंद: ३३४८
ग्रामीणमध्ये वेगवेगळ्या तालुक्यात उपचारादरम्यान रुग्ण दगावतात. याची कंट्रोलरुमकडे माहिती येण्यास विलंब होतो. हीच परिस्थिती शहरातही आहे. रुग्णालयात उपचाराचा असलेला लोड पाहता रुग्णालये मृत्यूची माहिती एक दिवस उशिराने कळवितात. त्यानंतर खातरजमा करण्यात एक दिवस जातो. यामुळे आकड्यांची ही तफावत दिसून येते. माहिती भरेल तसे पोर्टलवर आकडेवारी अपडेट होते.
डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्याधिकारी