अक्कलकोट : शहर व तालुक्यात काही भागांमध्ये डेंग्यूने थैमान घातले आहे़ परिणामत: समर्थ नगर येथील एका ४० वर्षीय महिलेचा आणि अकरावीमध्ये शिकणाºया विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तालुक्यात ५०० हून अधिक लोकांना हा आजार जडला आहे. हे रुग्ण विविध ठिकाणच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. या साºया घडामोडीत आरोग्य यंंत्रणा मात्र सुस्त बनली असल्याचा आरोप सर्वसामान्यातून होतोय.
विवाहित महिला रेशमा सदाशिव म्हेत्री (वय ४०) आणि विजयालक्ष्मी राजेंद्र कोळी (वय १८) अशी मरण पावलेल्या दोघींची नावे असून तीन दिवसांपूर्वी या दोघींचा मृत्यू झाला़ मयत विजयालक्ष्मी ही ११ वी वर्गात कॉमर्स शाखेला शिकत होती. डेंग्यूची लागण झाल्यानंतर या दोघींना सोलापूर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ तेथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला़ या दोघीही अक्कलकोट तालुक्यात समर्थ नगर येथील रहिवासी आहेत.
तालुक्यात डेंग्यू आजारामुळे शरीरातील पेशी कमी होऊन उपचार घेणाºया रुग्णांची संख्या वाढली आहे. पाय पसरलेल्या या आजारावर उपाययोजना करण्यात नगरपालिका व आरोग्य विभाग यंत्रणा कुचकामी ठरली आहे. या जीवघेण्या आजारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य यंत्रणेकडून उपाय योजनेची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मागील १५ दिवसांत अक्कलकोट शहर व तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे सर्वत्र पाणी साचून दलदल निर्माण झाली आहे. डास मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नगरपालिका, संबंधित ग्रामपंचायती यांनी फवारणी, फॉगिंग करणे, घरोघरी फिरून पाण्याच्या साठवण टाकीत औषध टाकणे अशा उपाययोजना करणे गरजेचे आहे. रुग्णालयात औषधसाठ्याचा आढाावा घेण्याची आवश्यक्ता आहे़ आरोग्य प्रशासनाच्या कुठल्याच हालचाली दिसत नाहीत़ हत्तीरोग कार्यालयाकडून उघड्या गटारीवर फवारणी होत नाही़ ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय, खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे
या भागात वाढले आहेत रुग्ण- शिवाजीनगर तांडा, म्हेत्रे नगर, समर्थनगर,माणिक पेठ, खासबाग, संजय नगर, इंदिरा नगर, भीमनगर, नाईकवाडी गल्ली, बागवान गल्ली अशा विविध भागात रुग्ण आढळून येत आहेत. अलीक डे या भागातून या रुग्णांची संख्या वाढत चालली असून या ठिक ाणी आरोग्य यंत्रणेने धुराळणी, फवारणी आणि उपाययोजना सुरू केलेल्या दिसत नाहीत़
टंचाईमुळे बरेच लोक पाणी साठवून ठेवतात. किमान आठ दिवसातून एकदा तरी कोरडा दिवस पाळला पाहिजे़ आरोग्य कर्मचारी, नगरपालिका, ग्रामपंचायत, हत्तीरोग कार्यालय यांनी आपापल्या पातळीवर यंत्रणा राबवावी. विशेषत: फॉगिंग, फवारणी करणे आवश्यक आहे. नागरिकांनीसुद्धा डेंग्यू होऊ नये म्हणून परिसरातील साचलेले पाणी निकामी करावे. अशा प्रकारेच रुग्ण वाढत आहेत. ग्रामीण रुग्णालयात सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत़ - डॉ अशोक राठोडअधीक्षक, ग्रामीण रुग्णालय