सोलापूर : महापालिकेच्या डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्याने रेणुका लालप्पा नल्ला (वय ६९, रा. कोंडा नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) या महिलेचा तडफडून मृत्यू झाला. या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह होती. ही घटना बुधवारी सकाळी वालचंद महाविद्यालयातील क्वारंटाईन सेंटरमध्ये साडेआठ वाजण्याच्या सुमाराला घडली.
यानंतर सेंटरमधील महिला, मुले यांनी गोंधळ केला. आम्हाला इथून बाहेर काढा, अशी मागणी केली. दरम्यान, याप्रकरणी वैद्यकीय अधिकाºयांसह तीन डॉक्टर आणि सेंटरच्या नियंत्रकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांची विभागीय चौकशी होईल, असे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.
रेणुका नल्ला यांच्या नातवाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे रेणुका नल्ला यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्यांना २४ जुलै रोजी वालचंद कॉलेजमधील मुलांच्या वसतिगृहातील क्वारंटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. रेणुका नल्ला यांच्या पतीची प्रकृती बरी नाही. त्यामुळे पती आणि मुलगा लक्ष्मण हे घरीच राहून उपचार घेत होते. मुलगा लक्ष्मण बुधवारी सकाळी आठ वाजता चहा आणि नाश्ता घेऊन आईला भेटायला आला. आईने श्वास घेताना दम लागत असल्याचे सांगितले. वास घ्यायला त्रास होत असून, मला इथून घेऊन चल, असे मुलाला सांगितले. लक्ष्मण यांनी खाली येऊन महापालिकेच्या डॉक्टरांना फोन केला. त्यांनी दहा वाजता तपासणी होईल सांगितले. त्यामुळे लक्ष्मण यांनी खासगी अॅम्ब्युलन्स मिळवायचा प्रयत्न केला. आईला पाहण्यासाठी ते वर क्वारंटाईन सेंटरमधील खोलीमध्ये गेले. तोपर्यंत आईने प्राण सोडला होता.
या प्रकरणानंतर क्वारंटाईन सेंटरमध्ये गोंधळ सुरू झाला. लोक संतापले. आम्हाला या ठिकाणावरून बाहेर काढा, अशी मागणी करू लागले. यादरम्यान, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे पदाधिकारी पोहोचले. पोलीस उपायुक्त बापू बांगर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त पंकज जावळे, अजयसिंह पवार, आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव यांच्यासह मनपा अधिकारी, पोलीस कर्मचारी पोहोचले. आरोग्य विभागाच्या निर्देशामुळे कोणालाही बाहेर काढता येणार नाही. क्वारंटाईन सेंटरमध्ये चांगल्या सुविधा दिल्या जातील, असे आश्वासन दिले. नगरसेवकांनी नागरिकांची मनधरणी केली.
वैद्यकीय अधिकाºयांची चूकया प्रकरणात वैद्यकीय अधिकाºयांची चूक असल्याचे स्पष्ट दिसते. त्यासोबत या सेंटरमध्ये नेमणुकीस असलेल्या दोन डॉक्टरांचा हलगर्जीपणा दिसतो. सेंटरचे काम पाहण्यासाठी नेमलेल्या नियंत्रकाचे दुर्लक्ष झाले. याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर कारवाई होईल. विभागीय चौकशी करून पुढील कारवाईचा प्रस्ताव ठेवला जाईल.-पी. शिवशंकर, आयुक्त, मनपा.
यांच्यावर होणार कारवाईमहिलेच्या मृत्यूप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवकांची चिप्पा, डॉ.काजल कोडिटकर, नियंत्रण अधिकारी प्रताप खरात, सनियंत्रण अधिकारी महेश क्षीरसागर, लिपिक भीम जन्मले, लिपिक अशोक म्हेत्रे, लिपिक सिद्धगोंडा जत्ती तसेच वैद्यकीय अधिकारी वाय. एस. पेलेलू यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आरोग्य अधिकाºयांना याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी व्यक्तींवर तत्काळ प्रशासकीय कारवाई होईल, असे उपायुक्त पंकज जावळे यांनी सांगितले.
गुन्हा दाखल करामहापालिका उपचारात हलगर्जीपणा केल्याबद्दल खासगी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करीत आहे. या प्रकरणात मनपाच्या डॉक्टरांसह या ठिकाणी नेमणुकीस असलेल्या अधिकाºयांवर गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, शिवसेनेचे नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी केली.
मृत्यूला भाजप जबाबदार : वाले क्वारंटाईन सेंटरमधील मृत्यूप्रकरणी राजकारण तापले. क्वारंटाईन सेंटरमध्ये निकृष्ट जेवण मिळते. गरम पाणी नाही. नियमित स्वच्छता नाही. भाजपच्या महापौर, उपमहापौर, आरोग्य सभापती यांच्यात समन्वय नाही. अधिकारी यांना विचारात नाहीत. भाजपचे लोक नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. या भोंगळ कारभारामुळे वृद्ध महिलेचा जीव गेला. भविष्यातही अनेकांचे जीव जातील. याप्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक बाबा मिस्त्री, चेतन नरोटे आदींनी केली.