सोलापूर : पोलिओऐवजी चुकून कावीळचा डोस दिल्याने बेलाटीतील सात मुलांना रिॲक्शन आल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. या बालकांना सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले असून प्रकृती चांगली असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
जिल्हा आरोग्य विभागातर्फे सध्या बालकांना लसीकरण सुरू आहे. बेलाटी उप केंद्रावर पोलिओ लसीकरण ठेवण्यात आले होते. आरोग्य सेविका शिंदे यांनी सात बालकांना लसीकरण केले. ही बालके घरी गेल्यानंतर एक बालक उलट्या करून बेशुद्ध पडले. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी घाईने रुग्णालयात धाव घेतली. याच दरम्यान दुसऱ्या दोन मुलांना ताप आल्याचे निदर्शनाला आले. लसीकरणात काही तरी गडबड आहे, असे लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी आरोग्य उप केंद्रात धाव घेतली. गडबडीची माहिती मिळाल्यावर तिऱ्हे आरोग्य केंद्राचे डॉ. गोडसे, डॉ. राऊतराव तेथे आले. तपासणीत आरोग्य सेविकेने पोलिओऐवजी कावीळची लस दिल्याचे दिसून आले. यापूर्वी या बालकांना पेंटा व्हायलंट लस दिली होती. यात कावीळची लस असते. आज पुन्हा डोस दिल्याने त्रास सुरू झाल्याचे दिसून आले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व बालकांना उपचारासाठी सोलापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकाराने ग्रामस्थ संतप्त झाले होते. पोलिसांनी त्यांची समजूत काढली.
सर्व बालके सुखरूप
हा प्रकार उघडकीस आल्यावर जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे सोलापुरात दाखल झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे नगर परिषदेच्या मतदानाची पाहणी करून परतत होते. त्यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेत बालकांची चौकशी केली. डोस अतिरिक्त झाल्याने रिॲक्शन येते, त्यामुळे बालकांना तज्ज्ञांच्या निगराणीखाली ७२ तास ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाची समितीमार्फत चौकशी करून संबंधितावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
लसीकरण काळजीपूर्वक
दीड, अडीच व साडेतीन महिन्याच्या बालकांना लसीकरण करताना काळजी घ्यावी लागते. वेळापत्रकाप्रमाणे ठरलेली लस देणे गरजेचे असते. पोलिओची मात्र डोस व इंजेक्शनमध्ये आहे. हेपॅटाटीस बी व पोलिओची लस देण्याची पद्धतही वेगळी आहे. पेंटा व्हायलटमध्ये अनेक लसीचे मिश्रण असते. त्यामुळे पूर्वी कोणती लस दिली याचा इतिहास जाणून लसीकरण करणे अपेक्षित आहे.