सोलापूर : शनिवारी सायंकाळी सोलापूर एसटी स्थानकातून वीस वर्षे सुरक्षित सेवा केलेल्या शरणप्पा बेनुरे या चालकाने मद्यधुंद अवस्थेत एसटी गाडी पळवली. याप्रकरणी बेनुरे याच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
त्याने दारूच्या नशेमध्ये नातेवाइकांना भेटण्यासाठी एसटीने तेलगाव गेल्याची माहिती तपासात मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे सर्व एसटी गाड्या बंद आहेत; पण नातेवाइकांना भेटण्यासाठी आरोपी बेनुरे याने दारूच्या नशेमध्ये चक्क एसटी गाडी घेऊन तेलगाव येथील पाहुण्यांच्या घरी भेटायला गेला. हा प्रकार अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या गाडीचा शोध सुरू केला. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने पाठलाग करून त्या चालकाला तेलगाव गावाजवळ पकडले. त्याला मंद्रुप पोलिसांनी फौजदार चावडी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्याला रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक बरडे हे करत आहेत.
मास्टरचावीने पळवली गाडी
एसटी गाड्यांच्या चालकांकडे एक मास्टर चावी असते. या मास्टर चावीने बेनुरे याने गाडी काढली व थेट मंद्रूपमार्गे तेलगावकडे निघाला. दरम्यान, पोलिसांनी त्याचा शोध घेत ही गाडी अडवली. त्यानंतर रात्री उशिरा फौजदार चावडी पोलीस यांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, त्या एसटी चालकाची चौकशी होणार असून त्यानंतर त्याच्यावर निलंबनाची अथवा बडतर्फीची कारवाई होऊ शकते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
बेनुरेची चोवीस वर्षे सेवा
एसटीमधील चालकांना विना अपघात प्रवाशांना सुखरूप आपल्या इच्छितस्थळी सोडल्यानंतर त्या चालकांचा प्रत्येक पाच वर्षांनंतर सुरक्षित सेवा केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येतो. बेनुरे याने एसटीमध्ये आतापर्यंत २४ वर्षे सेवा बजावली आहे. त्यात त्याने २० वर्षे सुरक्षित सेवा केल्याबद्दल त्याचा बिल्ला देऊन सत्कार ही करण्यात आला आहे. त्याने दारूच्या नशेत गाडी चालवली; पण तेलगावपर्यंत विनाअपघात त्याने गाडी नेल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.