सोलापूर : स्मार्ट टीव्ही आणि मोबाईलमध्ये अनेक प्रकाराचा कंटेट उपलब्ध होत आहे. यामुळे मुले टीव्हीकडून वेबसिरीजकडे जात आहेत. वेबसिरीजचे सर्वच भाग एकाच रात्री बघण्याचा मोह मुलांना होत आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्यात बदल घडत आहेत. त्यामुळे पालकांनी आपली मुले वेबसिरीजच्या आहारी तर गेले नाहीत ना हे तपासून पाहण्याची गरज मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केली.
टीनेजर्स मुलांचे वय हे घडण्याचे जितके असते तसेच ते बिघडण्याचेही असते. याच वयात त्यांचे व्यक्तिमत्त्व घडून एक प्रकृती तयारी होते. या काळात जर वेबसिरीजच्या माध्यमातून क्राईम (गुन्हेगारी) आणि सेक्शुअल (अश्लील) कंटेट पाहण्यात आला तर त्याचे वाईट परिणाम मुलांच्या मनावर घडतात. लहानशा खेड्यापासून ते मोठ्या शहरात अशा त्रासांना मुलांना सामोरे जावे लागत आहे.
काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये एका मुलाने वडिलांचाच खून केला. त्याला मित्र नव्हते, एकलकोंडा झाल्याने तो वेबसिरीजच्या जाळ्यात ओढला गेला. पालकांनी वेळ न दिल्यामुळे त्यांच्याविषयीचा राग मनात होता. त्यामुळे खून करेपर्यंत त्याची मजल गेली. हे सगळे एका दिवसात झाले नव्हते. हळूहळू ही प्रक्रिया घडत असते.
-------
ही पहा उदाहरणे
- - शाळा बंद असल्यामुळे एक मुलगा सकाळी नव्हे तर दुपारी उठत होता. रात्रभर वेबसिरीज पाहिल्याने त्याच्या सवयीत बदल झाला. कोणतेही काम करताना तो हळूहळू करत होता. त्यामुळे त्याच्या पालकाने मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेतली.
- - वेबसिरीज सतत पाहिल्यामुळे त्यातील कंटेटचा मुलांच्या मनावर परिणाम झाला. मुलांमध्ये अभ्यास न करणे, चिडचिडेपणात वाढ होत असल्याच्या तक्रारी पालक करत आहेत.
- - किशोरवयीन मुलांमध्ये समजूतदारपणा कमी असतो. आपल्याला सगळेच कळते, आता मी मोठा झालो आहे अशा भावना त्यांच्यात तयार होतात. त्यात पालकांचे मैत्रीपूर्ण संबंध नसल्यामुळे घरातून जाण्याच्या घटना घडत आहेत.
-------
मुले मोबाईलवर काय पाहत आहेत ?
आपली मुले मोबाईलवर काय पाहत आहेत याकडे पालकांचे लक्ष असायला हवे. याचा अर्थ मुलांना मोबाईल देऊच नये असा होत नाही. ते काय पाहतात याविषयी मुलांना बोलते करावे. मित्राप्रमाणे मुलांना समजावून सांगितले तर ते ऐकतात. जर कौटुंबिक वातावरण आनंदी, उत्साही व मनमोकळे राहात असेल, आपली मुलंही मोबाईलपासून दूर राहतात. पालकांनी मुलांबरोबर असताना मोबाईल थोडा बाजूला ठेवायला हवा.
----
- पालकांनी फक्त पालक न राहता मित्र व पालक अशा दोन्ही भूमिकेतून मुलांकडे पाहावे. त्यांना अधिक वेळ द्यावा. मुले आणि पालक हे सुसंवाद (शेअरिंग) करत असल्यास त्यांच्यात मित्रत्वाचे नाते तयार होते. त्यामुळे मुले नेमके काय करतात हे पाहणे सोपे होऊन वेळीच मुलांना वेबसिरीजच्या धोक्यापासून दूर ठेवता येते. यासोबतच मुलांना मैदानी खेळ, घरातील खेळ किंवा एखाद्या छंदात सहभाग घ्यायला लावावा.
- - डॉ. कुंदन कांबळे, मानसोपचार तज्ज्ञ