सोलापूर : एनसीआरबीचा अहवाल नुकताच जाहीर झाला. त्यात देशभरातील महिला गुन्हेगारीविषयक माहिती प्रसिद्ध करण्यात आली. त्यात सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात महिलांवर अत्याचाराच्या एकूण ७४ घटना घडल्या आहेत. म्हणजेच प्रत्येक पाच दिवसांनंतर अत्याचाराची एक घटना घडत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे.
एनसीआरबीच्या अहवालानुसार ग्रामीण भागात साठ महिलांनी आत्महत्या करण्यासाठी चिथावणी देण्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय हुंडाबळीच्या घटनाही वाढल्या असून, २०२० मध्ये १३६ गुन्हे दाखल झाले आहेत, अशी धक्कादायक माहिती या रिपोर्टमधून समोर येत आहे.
करमाळ्याचा बाबा
करमाळा येथे मनोहर बाबाने आपल्या याचना घेऊन आलेल्या एका महिलेला आपल्या सोबत आश्रमात राहण्यास सांगून, तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नुकतीच दाखल झाली. इतकेच नव्हे, तर बाबाच्या शिष्यानेही अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामुळे ज्या बाबाच्या दर्शनासाठी तासन् तास रांगा लागत होत्या, त्या बाबाची भांडाफोड झाली आहे, अशी चर्चा नागरिकांमधून आहे.
विजापूर रोड घटना
शहरात दोन वर्षांपूर्वी विजापूर नाका येथील एका १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेत नऊ रिक्षाचालकांसह सोळाजणांवर गुन्हा दाखल झाला होता. ही घटना घडल्यामुळे रिक्षात एकटे प्रवास करण्यासाठी महिलांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे.
रिक्षाचालकाने केला प्रवासी महिलेवर अत्याचार
दररोज आपल्या रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेची ओळख वाढवून रिक्षाचालकाने महिलेला निर्जनस्थळी घेऊन जात तिला कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याची घटना नुकतीच जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे. या अशा अनेक घटनांमुळे महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. अनेक घटनांमुळे सोलापूर शहर, जिल्हा हादरला आहे.
अत्याचाराच्या घटना
- शहर १९
- जिल्हा ७४
फूस लावून पळविले
- शहर ६४
- जिल्हा १३४
बाललैंगिक अत्याचार
- शहर ८२
- जिल्हा १६२