सोलापूर : किरकोळ भांडण असो, प्रेम प्रकरण असो किंवा अन्य कोणत्याही कारणावरून घरातून निघून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील सात पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याच्या तक्रारी वाढल्या असून, त्यात महिला व मुलींची संख्या सर्वात जास्त आहे.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सात पोलीस ठाणे आहेत. गेल्या वर्षभरात १२५ लोक बेपत्ता झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. तक्रारीमध्ये १५ वर्षांपासून ६० वर्षांपर्यंतच्या मुली व महिलांचा समावेश आहे. मुली व महिला घरातील किरकोळ वादातून निघून गेल्या आहेत, तर बहुतांश मुली प्रेम प्रकरणातून बेपत्ता झाल्याचे पुढे आले आहे. काही मुली व महिलांचा शोध लवकर लागला, तर काहींचा वर्ष झालेतरी पत्ता लागला नाही.
घरातील भांडण, मुलांकडून होणारा त्रास याला कंटाळून वृद्ध पुरुष, महिलांनी घर सोडलं आहे. काही जणांचा शोध लागला, त्यात काही लोक आत्महत्या केल्याचेही पुढे आले आहे. पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात येतो. अनेकजण मिळून आले त्यांना पुन्हा कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. हद्दवाढ भागात काही महिला या प्रेम प्रकरणातून पळून गेल्याचेही उघडकीस आले आहे.
राग अन् प्रेम...
= घरातील वाद मिटत नाही, आईवडील, मुलगा, सून, नातू आदी नातेवाईक ऐकत नाहीत. आपल्याशी कोणी जुळवून घेत नाहीत. सतत आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाल्याने मानसिक तणावाखाली घर सोडलं आहे. अल्पवयीन असो किंवा वयात आलेल्या मुली प्रेम प्रकरणातून घर सोडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. राग अन् प्रेम या दोन गोष्टींमुळेच घरातून बेपत्ता होण्याच प्रमाण वाढले आहे.
पोलीस ठाणे बेपत्ता शोध
- फौजदार चावडी पोलीस ठाणे १८ १६
- जेलरोड पोलीस ठाणे १७ १५
- सदर बझार पोलाीस ठाणे १९ १५
- विजापूर नाका पोलीस ठाणे २१ २०
- सलगवस्ती पाेलीस ठाणे १२ ११
- जोडभावी पेठ पोलीस ठाणे १३ १२
- एमआयडीसी पोलीस ठाणे २५ २१
पोलिसांमुळे पुन्हा गळा भेट
- किरकोळ वादातून एक वृद्ध महिला घरातून निघून गेली हाेती. विजापूर नाका पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी शोध घेतला, तब्बल तीन महिन्यांनंतर महिला ग्रामीण भागात मिळून आली. सुनांसोबत निर्माण झालेल्या मतभेदामुळे ती घरातून निघून गेली होती. शेवटी पोलिसांनी तिचा शोध घेऊन पुन्हा मुलांना आईची भेट घडवून आणली.
लहान मूल असो किंवा वृद्ध व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर, त्यांचे फोटो सर्व पोलीस ठाणे, ग्रामीण भागातील पोलीस ठाणे व त्या पलीकडे जिल्ह्याबाहेरच्या पोलिसांना पाठवले जातात. त्यामुळे बेपत्ता झालेल्या बहुतांश लोकांचा शोध लागतो.
डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त.