सोलापूर : घरगुती वादातून २३ वर्षीय तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, १४ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. मयत तरुणाचे पुढील महिन्यात विवाह होणार होता. हात पिवळे अन् डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच तरुणाने आत्महत्या केल्याने या घटनेची नोंद सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात झाली आहे.
अनिकेत अरुण जाधव (वय २३, रा. सेंटलमेंट फ्री कॉलनी नंबर १, सोलापूर ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अनिकेत हा अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा होता. तो मजुरीचे काम करीत होता. मागील काही दिवसांपासून घरात किरकोळ कारणावरून सातत्याने भांडण होत होते. काही दिवसांपूर्वी नातेवाइकांनी मयत अनिकेत याचा विवाह जुळविला होता. पुढील महिन्यात विवाह होणार होता. दरम्यान, मंगळवार, १४ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास धावत्या रेल्वेखाली सापडून आत्महत्या केली. भरधाव रेल्वेच्या धडकेत अनिकेतचे मुंडके धडावेगळे झाले होते. या घटनेची नोंद लोहमार्ग पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस नाईक प्रमोद सुरवसे करीत आहेत. लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले.
-----------
पोलिसांनी केला लाठीचार्ज...
अनिकेतच्या आत्महत्येनंतर रेल्वे रुळावर पडलेला मृतदेह पाहण्यासाठी सेंटलमेंट कॉलनी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे शहर पोलिसांचे एक पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. नातेवाइकांचा आक्रोश अन् लोकांनी केलेली गर्दी हटविण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.
---------
नातेवाइकांचा आक्रोश...
घटनेची माहिती मिळताच अनिकेतच्या कुटुुंबीयांनी घटनास्थळी दाखल झाले. धडावेगळे मुंडके व रेल्वे रुळावर पडलेला अनिकेतचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी आक्रोश केला. अनिकेतच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. अनिकेत हा शांत स्वभावाचा होता, असे त्याच्या मित्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
--------------
घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस कर्मचारी राजू जमादार यांच्यामुळे मृतदेहाची ओळख पटली. मृतदेह ताब्यात घेऊन तो शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
- प्रकाश सुरवसे,
पोलीस नाईक, लोहमार्ग पोलीस, सोलापूर