सोलापूर : करमाळा तालुक्यातील वीट येथे शेतातील ओढ्याच्या कडेला असलेल्या चिखलात अडकलेली चप्पल निदर्शनास आली अन् महिलेचा खून करणारा संशयित पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पैशासाठी ब्लॅकमेल करीत होती म्हणून तिचा काटा काढला, अशी कबुली संशयित आरोपीने पोलिसांना दिली.
धनाजी प्रभाकर गाडे (वय २७, रा. वीट, ता. करमाळा) असे अटक करण्यात आलेल्या या संशयिताचे नाव आहे. धनाजी गाडे व खून झालेली महिला यांचे शेत एकमेकांच्या शेजारी आहे. बुधवारी (दि. १७) दुपारी दोन वाजता महिलेचा मृतदेह अर्धविवस्त्र अवस्थेत आढळून आला होता. महिलेच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने तिचा कोणीतरी खून केला असावा, असा संशय आला. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घटनेची गंभीर दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस व करमाळा पोलीस ठाण्याच्या पोलिसांना तपास करण्याबाबत आदेश दिले होते.
नेमका खून कोणी आणि कशासाठी केला, याचा तपास करीत असताना घटनास्थळावर चिखलामध्ये रुतलेली चप्पल दिसून आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चप्पल कोणाचे आहे याची माहिती घेतली तेव्हा ती धनाजी गाडे याची असल्याचे समजले. पोलिसांनी धनाजी गाडे याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केल्यावर मात्र त्याने खून केल्याची कबुली दिली. महिला सतत माझ्याकडे पैशाची मागणी करीत होती. पैसे दिले नाही की आपल्या दोघांतील संबंध सगळ्यांना सांगेन, पोलिसात तक्रार करीन अशी धमकी देत होती. त्यामुळे तिचा काटा काढण्याचा निर्णय घेतला अन् दगडाने डोके फोडून तिचा खून केला, अशी कबुली धनाजी गाडे याने पोलिसांना दिली.
दगडाचा फटका मारताच महिला बेशुद्ध झाली
0 दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास महिला नेहमीप्रमाणे जेवण व पाणी घेऊन स्वतःच्या शेतामध्ये गेली होती. शेतामध्ये महिला कामाला आल्या नव्हत्या; त्यामुळे ती डब्याजवळ गेली. जेवणाचे ताट घेऊन ती जवळच असलेल्या ओढ्याजवळ ताट धुण्यासाठी गेली. दरम्यान, धनाजी गाडे हा तेथे गेला. त्याने खिशामध्ये ठेवलेल्या गोल आकाराच्या दगडाने पाठीमागून तिच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. पहिल्या फटक्यातच महिला बेशुद्ध होऊन पडली. नंतर तिला उचलून बाजूला असलेल्या चिलारीच्या झुडपात नेले. तिथे पुन्हा तिच्या डोक्यावर प्रहार करून खून केला असल्याची कबुली धनाजी गाडे याने दिली, अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
पतीने आरडाओरड केल्यानंतर संशयित आरोपीसुद्धा धावत आला
0 महिलेचा मुलगा शाळेतून आल्यानंतर आईला शोधण्यासाठी तो शेतामध्ये आला. मात्र तिथे आईची चप्पल आणि स्कार्फ या दोन वस्तू दिसल्या. मात्र आई नसल्यामुळे त्याने वडिलांना फोन केला. वडील घटनास्थळी पत्नीचा शोध घेत असताना त्यांना चिलारीच्या झुडपात पत्नी पडल्याचे आढळून आले. पती आरडाओरड करू लागला तेव्हा आजूबाजूच्या शेतातील लोक धावत आले. त्यांमध्ये संशयित आरोपी धनाजी गाडे हादेखील धावत आला. ‘काय झालं... काय झालं?’ अशी विचारणा करून त्यानेही आश्चर्य व्यक्त केले होते.