सोलापूर : चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीला विषारी औषध पाजून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.जी. मोहिते यांनी पतीला दहा वर्षांच्या सक्तमजुरीची व दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
नामदेव रामचंद्र चोरमुले (वय ४४,रा. चोरमुले वस्ती, वाघोली, ता. मोहोळ) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खटल्याची पार्श्वभूमी अशी की, नामदेव चोरमुले हा दि.१ आॅगस्ट २०१५ रोजी रात्री ८ वाजता घरी आला. तेव्हा त्याची पत्नी राणी नामदेव चोरमुले ही शेजारी असलेल्या बहीण सुनीता पाडुळे हिच्या घरात बसली होती. नामदेव चोरमुले तेथे गेला व त्याने दारूच्या नशेत पत्नीला शिवीगाळ करू लागला. पत्नी उठली व स्वत:च्या घरात आली. तेव्हा नामदेव चोरमुले हा घरात येऊन रात्रभर भांडत राहिला. दुसºया दिवशी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तू वागण्यास नीट नाही, तुझे कोणाबरोबर लफडे आहे असे म्हणत घरातील गोचीड मारण्याच्या औषधाची बाटली घेतली. तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत पत्नीच्या छातीवर बसून जबरदस्तीने गोचीड मारण्याचे औषध पाजले होते. औषध तोंडात गेल्याने पत्नीला त्रास होऊ लागला व ती बेशुद्ध झाली होती. नातेवाईकांनी तिला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात तिची फिर्याद घेतली.
या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. नामदेव चोरमुले याला अटक करून सहायक पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे व डी.बी. खैरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. अहमद काझी तर आरोपीतर्फे अॅड. एस.आर. शेटे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल धर्मे यांनी काम पाहिले.
आरोपीला दया दाखवू नये : अॅड. अहमद काझी- खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी साक्ष व वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. शिक्षेच्या मुद्यावर युक्तिवाद करताना सरकारी वकील अॅड. अहमद काझी यांनी आरोपीला दया दाखवू नये कारण असे प्रसंग त्याने यापूर्वीही अनेक वेळा केले होते. पूर्वी अंगावर रॉकेल ओतले होते. भविष्यात असे आणखी प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी असा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा. दंड न भरल्यास एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.