सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपच्चार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात ‘पे ॲण्ड पार्किंग’ नसल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी दररोज एक हजार वाहनांकडून दहा हजार रुपयांची वसुली होत आहे. ‘पे ॲण्ड पार्किंग’ आहेच, असे म्हणत पार्किंगवाल्यांनी अधिष्ठातांकडे तीन लाख रुपये भरले आहेत, असे छातीठोकपणे सांगताना दिसतात.
यावर सिव्हिल प्रशासन काय निर्णय घेते, याकडे रुग्ण अन् नातेवाइकांचे लक्ष लागले आहे. याबाबत पार्किंग जागेवर पैसे वसूल करणाऱ्या रवी खंडेलवार यांना विचारले असता त्यांनी अधिष्ठातांकडे तीन लाख रुपये भरून मक्ता घेतल्याची माहिती दिली. मक्त्याचे करारपत्र आहे आणि ते व्हॉट्सॲपवर पाठवितो असे ते म्हणाले. सिव्हिल प्रशासन आणि आमचे जमत नाही. आम्ही जर अनधिकृत असतो तर त्यांनी आम्हाला हाकलून दिले असते, असेही खंडेलवाल यांनी सांगितले.
पार्किंगचा मक्ता कोणालाही दिलेला नाही, त्यामुळे मक्ता रक्कम स्वीकारण्याचा विषयच येत नाही. बेकायदा पार्किंग चालकावर कारवाई करणार असल्याची माहिती सिव्हिल प्रशासनाने ‘लोकमत’ला दिली आहे. बी ब्लॉकच्या डाव्या बाजूला तसेच ए ब्लॉकच्या इमारतीसमोर पार्किंगची सुविधा आहे. येथे काही माणसे पे ॲण्ड पार्कच्या नावाखाली पैसे वसूल करतायेत. याबाबत प्रशासनाला विचारले असता त्यांनी हे सर्व अनधिकृतपणे सुरू असल्याचे सांगितले.
सिव्हिलचे नाव वापरून पावती देतात
बी ब्लॉकच्या डाव्या बाजूला दोन तगडी माणसे खुर्चीवर बसून पैसे वसूल करताना दिसली, तर ए ब्लॉकच्या समोर तीन ते चार माणसं पावती देऊन पैसे वसूल करत होते. पावतीवर सिव्हिलचे नाव होते. पावतीवर नंबर असून, नंबर सहा हजारांपुढे आहे. पावतीवर वाहनांचा नंबरदेखील नमूद केला जातो. फोन पे व गुगल पे द्वारेही पैसे स्वीकारले जात होते.
.................
अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांना काही प्रश्न
- पे ॲण्ड पार्किंग सुविधा चालविणारे कोण आहेत
- डॉ. ठाकूर : माहीत नाही
- त्यांना मक्ता दिलेला आहे का?
- डॉ. ठाकूर : नाही
- मग त्यांच्यावर का कारवाई केली नाही?
- डॉ. ठाकूर : कोणी तक्रार केली नाही. तक्रार आल्यावर कारवाई करू
- पुढे काय?
- डॉ. ठाकूर : नवीन मक्ता काढणार आहोत, त्याची प्रक्रिया सुरू आहे.