सोलापूर : कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचारादरम्यान रुग्णावर मेडिसीनचा अतिवापर झाला आणि त्याचा दुष्परिणाम थेट यकृतावर झाला. यकृत निकामी झाल्याने सोलापुरातून उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले; मात्र त्यात फारशी सुधारणा झाली नाही अखेर मृत्यू ओढवला. हा प्रकार एका पोलीस अधीक्षकांच्या आईबाबत घडला.
कोरोनाच्या भीतीने जसे रुग्ण आत्मविश्वास गमावतात तसेच डॉक्टरांच्या अतिकाळजीने रुग्ण दगावण्याचे प्रसंग घडत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील यांच्या पत्नी फातिमा ऊर्फ फरजाना पाटील यांना कोरोनाची बाधा झाली. खासगी रुग्णालयातील उपचाराने फारसा फरक पडत नसल्याचे लक्षात येताच त्यांना सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे सुपुत्र सलमानताज पाटील लखनऊ- सुलतानपूरचे पोलीस अधीक्षक आहेत.अतिमहत्त्वाच्या व्यक्ती म्हणून डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली पण ते व्यर्थ ठरले.
फातिमा पाटील यांच्यावर कोरोनासाठीच्या औषधांचा अतिवापर करण्यात आला. विशेषत: रेमडेसिव्हर या औषधांचा वापर अधिक झाला. आठवडाभरात त्या निगेटिव्ह झाल्या खºया पण या औषधांच्या अतिवापरामुळे त्यांच्या यकृतावर परिणाम झाला. यकृत हळूहळू निकामी होत गेले. पुन्हा त्यांना उपचारासाठी सहकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही बाब डॉक्टरांच्या निदर्शनास आली, तोपर्यंत वेळ पुढे गेली होती. यकृत पूर्णत: निकामी झाल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला विख्यात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
यकृत प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय डॉक्टरांनी कुटुंबीयांना सुचवला. त्याची सर्व तयारी झाली. त्यांचाच दुसरा मुलगा यकृत देण्यास तयार झाला. सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्या. मोठी रक्कम अनामत म्हणून हॉस्पिटलमध्ये भरण्यात आली, परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. शुक्रवारी प्राणज्योत मालवली. केवळ मेडिसीनच्या अतिवापरामुळे हकनाक जीव गमवावा लागला. या प्रकाराने कोरोनाबाधित रुग्णांवरील व्हीआयपी रुग्णांवर केले जाणारे महागडे उपचार,औषधांचा अतिवापर जीवांवर बेतू शकतात हे निदर्शनास आले आहे.
म्हणून झाले यकृत निकामीफातिमा पाटील यांना यापूर्वी कधीच यकृताचा त्रास नव्हता. त्यांना कोरोनाच्या उपचारानंतर बरे वाटले. स्वॅब चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला; मात्र अवघ्या दोन दिवसांत काविळीची लक्षणे दिसू लागली. तपासणीनंतर औषधांच्या अतिवापरामुळे यकृत निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, फातिमा पाटील यांचे नातलग अखलाख जहागीरदार यांनी सांगितले.