सोलापूर : मला शाळा शिकायची आहे, असा हट्ट धरल्याने मारहाण केल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी सासू व पतीविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता हा प्रकार घडला.
सासू-राणीबाई शिवानंद येरटे (वय ४८), पती-शंकर शिवानंद येरटे (वय-२२ दोघे रा. धुम्मा वस्ती, लक्ष्मी पेठ, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राजश्री राजू भांडेकर (वय ३०, रा. विजापूर नाका, झोपडपट्टी नं.१, रेल्वे हद्द, सोलापूर) यांची मुलगी रिंकू हिचा दि. १ जानेवारी २०२० रोजी शंकर येरटे याच्यासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर ८ दिवसाने मुलगी माहेरी आली तेव्हा तिने आईला मला शाळा शिकायची खूप इच्छा आहे. पण सासरचे लोक मला शाळा शिकू देत नाहीत. मला शाळेला जायचं आहे म्हटलं की मारहाण करतात, खूप त्रास देतात असे सांगितले होते.
मयत रिंकू ही पुन्हा सासरी गेल्यानंतर ती फोन करून आईला सांगत होती की मला खूप मारहाण होत आहे माहेरी घेऊन जा. आई राजश्री भांडेकर यांनी जावई शंकर येरटे याला फोन करून मुलीला पाठवून देण्यास सांगितले; मात्र त्याने पत्नी रिंकूला पाठवून दिले नाही. दि.२५ फेब्रुवारी रोजी राजश्री भांडेकर यांनी शंकर येरटे याला फोन केला असता, त्याने मुलगी घरी येत असल्याचे सांगितले. मयत मुलगी रिंकूने पतीने मारहाण केल्याचे सांगितले होते. दुपारी १.३0 वाजता सासू राणीबाई येरटे हिने फोन करून राजश्री भांडेकर यांना मुलीने गळफास घेतला आहे असे सांगितले. राजश्री भांडेकर यांनी घरी जाऊन पाहिले असता मुलगी रिंकू ही लोखंडी गजाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने करीत आहेत.