सोलापूर: ठराविक दिवस वगळता जिल्हा परिषदेतील कार्यालयाला दांड्या मारणाऱ्या अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कारवाईचा डोस दिला आहे. त्यामुळे बुधवारपासून सर्व विभागप्रमुख आपल्या जागेवर हजर झाल्याचे चित्र दिसून आले.
जिल्हा परिषदेतील काही अधिकारी पदाधिकारी येण्यादिवशी म्हणजे सोमवार व गुरुवारीच कार्यालयात हजेरी लावताना आतापर्यंत दिसत होते. विभागप्रमुखच गायब असल्याने साहजिकच कर्मचारीही दांड्या मारत होते. त्यामुळे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना साहेब दौऱ्यावर आहेत, अशा थापा मारल्या जात होत्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार घेतल्यानंतर दिलीप स्वामी यांना अधिकाऱ्यांच्या या सवयीचा अनुभव आला. अनेक जण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठका, विभागीय आयुक्त व मंत्रालय अधिकाऱ्यांच्या बैठकीलाही दांडी मारल्याचे दिसून आले. पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारल्यावर उत्तर देण्यासही कोणी हजर राहत नसल्याचे दिसून आल्यावर दहा नियमावलीचे परिपत्रक स्वामी यांनी जारी केले आहे. यातील एकाही नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाईच केली जाईल, असा इशारा दिल्याने कार्यालयांमधील गर्दी वाढल्याचे दिसून आले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय यापुढे कोणीही बाहेरील कामाच्या दौऱ्यावर जाणार नाही, असा दंडक काढण्यात आला आहे. त्यामुळे कामाचे निमित्त करून घरीच बसणाऱ्याला आता चांगलीच चपराक बसली आहे.
लॉजवर चालत होत्या बैठका
बांधकाम, लघु पाटबंधारे खात्यातील अधिकारी सर्वसामान्यांना भेटणेच अवघड आहे. या अधिकाऱ्यांच्या बैठका तालुक्यातील लॉजवर चालतात, अशी धक्कादायक माहिती समोर आल्याचे सांगण्यात आले. काहींचे कागदोपत्री काम चांगले आहे, पण प्रत्यक्षात पाहणी करून खातरजमा करणार असल्याची मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी तंबी दिल्यानंतर अनेकांची पळापळ सुरू झाल्याचे दिसून आले.