बार्शी : मातृदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बार्शी तालुक्यातील उपळाई ठों. येथे मन सुन्न करणारी घटना घडली. मुलाच्या किडनीवर उपचार करण्यासाठी पैसे उपलब्ध होत नसल्याने नैराश्येतून त्याच्या आईने गावातीलच विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
कौशल्या बाबुराव भोंडवे (वय ५०, रा. उपळाई ठों, ता.बार्शी) असे त्या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मुलगा उत्तरेश्वर बाबुराव भोंडवे यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत कौशल्या व तिचे पती बाबुराव भोंडवे दोघेही उपळाई ठों. येथे मजुरी करून प्रपंच चालवित होते. त्यांना परमेश्वर व उत्तरेश्वर अशी दोन मुले आहेत. त्यातील परमेश्वर हा एका महाविद्यालयात शिकत असून तो किडनीच्या आजाराने त्रस्त आहे. त्यावर उपचार सुरू आहेत. त्या पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी २ लाख रुपये खर्च सांगितला. त्याची आई एवढे पैसे कोठून आणावयाचे म्हणून चिंतेत होती. शुक्रवार, दि. ६ मे रोजी दुपारी शेळ्या घेऊन गेल्यानंतर रात्री घरीच न आल्याने रात्रभर सर्वत्र चौकशी केली. त्या कुठेही मिळून आल्या नाहीत. दि. ७ मे रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गावातीलच एका विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. याबाबत पोलिसांना खबर देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले.
.................
मुलगा म्हणाला होता.. मला जगायचं नाही
एकेदिवशी परमेश्वर हा घरासमोर एकटाच नाराज होऊन बसला होता. तेव्हा आईने त्यास पाहिले असं का बसलास विचारल्यावर तो मला जगायची इच्छा नाही, असा म्हणाला होता. त्यानंतर फिर्यादी व त्याचे वडील घरी येताच आई दिसली नाही. त्यांनी परमेश्वर यास आई कोठे गेली. विचारताच दुपारी शेळ्या घेऊन गेली आहे असे सांगितले. त्यानंतर त्या घरीच परतल्या नाहीत. अखेर विहिरीत त्यांचा मृतदेहच सापडला.