सोलापूर : मोहोळ तालुक्यातील औंढी येथील शेतात वाºयाने पडलेला इलेक्ट्रिक पोल उभा करण्यासाठी ८२0 रूपये देण्याच्या कारणावरून खून केल्याप्रकरणी पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.पी. आव्हाड यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
विष्णू अंकुश सुळ (वय २५), पांडुरंग अंकुश सुळ (वय २७), सुभाष ज्ञानोबा सोलनकर (वय ४६, सर्व रा. औंढी, ता. मोहोळ, जि. सोलापूर), अर्जुन पांडुरंग मदने (वय ४४), संजय शामराव मदने (वय ३0, रा. कोताळे, ता. मोहोळ, ह.मु. पुळूजवाडी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
खटल्याची पार्श्वभूमी अशी की, अनिल मारूती ढोणे हे मयत गणेश मारूती ढोणे यांचे भाऊ होते. दि.१४ जून २0१६ रोजी त्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक पोल वाºयाने पडला होता. त्याच पोलवरून आरोपी पांडुरंग सुळ याने मोटारीकरिता विजेचे कनेक्शन घेतले होते. इलेक्ट्रिक पोल उभा करण्यासाठी अनिल ढोणे व विष्णू सुळ या दोघांनी निम्मा निम्मा खर्च करण्याचे ठरले होते. मयत गणेश ढोणे यांनी रवींद्र छबुराव भुसे, दामाजी भास्कर शिंदे यांच्याकडून पोल उभा करून घेतला. त्यासाठी मयत गणेश ढोणे यांनी १७00 रूपये मजुरी दिली. आरोपी विष्णू सुळ याच्याकडून ८२0 रूपये येणे होते. पैशाची मागणी केली असता, त्याने १८ जून २0१६ रोजी घरी बोलावले. अनिल ढोणे व मयत गणेश ढोणे हे दोघे पैसे घेण्यासाठी सकाळी विष्णू सुळ याच्या घरासमोर गेले. पैशाची मागणी केली असता, विष्णू सुळ आलो म्हणून घरात गेला. घरातून परत आला तेव्हा त्याच्या हातात ऊस तोडीचा कोयता होता. तुमचे कसले पैसे असे म्हणत त्याने कोयत्याने गणेश ढोणे याच्या डोक्यात जोरात वार केला. तेथे उपस्थित असलेल्या पांडुरंग सुळ, सुभाष सोलनकर, संजय शामराव मदने, अर्जुन मदने हे हातात काठ्या घेऊन आले व त्यांनी बेदम मारहाण केली होती. मारहाणीत गणेश ढोणे जखमी झाल्यानंतर उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले होते.
दरम्यान, गणेश ढोणे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात सात जणांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. यातील लाथाबुक्क्याने मारहाण केलेल्या कमल सुळ व पल्लवी सुळ या दोघींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणी सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत, मूळ फिर्यादीतर्फे अॅड. जयदीप माने यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून धर्मे यांनी काम पाहिले.
समान उद्देशाने खून - या प्रकरणी नऊ साक्षीदार तपासण्यात आले़ फिर्यादी, नेत्रसाक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली. प्रत्यक्षदर्शी पुरावा, परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुरावा, तज्ज्ञांचा अहवाल, सर्व पंचनामे हे सर्व सरकारी पक्षाच्या बाजूने आहेत, असे सांगत उच्च न्यायालयाचे निवाडे सादर करण्यात आले. समान उद्देशाने गणेश ढोणे यांचा खून केल्याचा युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली.