बार्शी/वैराग : कोरोनाचा विळखा जिल्ह्यात अधिकाधिक घट्ट होताना बार्शी तालुका मात्र आजवर सेफ राहिला होता. मात्र, सोमवारी याला छेद देत वैरागच्या किराणा दुकानदाराचा अहवाल पुणे येथील तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे सोलापूरच्या तपासणीत त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. दरम्यान, मुंबईहून आलेल्या जामगावच्या एका व्यक्तीला सोलापूरला हलवले आहे. बाजारपेठेचे गाव असलेला वैराग परिसर सील करण्यात आला आहे. प्रशासनाने दक्षता घेत दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या १५ जणांची तपासणी करून विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.
या घटनेने तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दुकानदाराचा सोलापूरच्या तपासणीत निगेटिव्ह अहवाल आला होता. मात्र, त्यांना त्रास होऊ लागल्याने पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. येथे त्यांच्या तपासणीत अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे तहसीलदार शेलार यांनी सांगितले.
कोरोनाचा पहिला रुग्ण वैराग येथे आढळल्याने बार्शी तालुक्यात मोठी खळबळ उडाली. याबाबत तहसीलदार प्रदीप शेलार, नायब तहसीलदार संजीवन मुंढे, तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर सावंत, वैरागचे तलाठी सतीश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जोगदंड, वैरागचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत गुंड, ग्रामविकास अधिकारी अनिल बारसकर यांच्या पथकाने सोमवारी तातडीने वैराग येथे आरोग्य समितीची बैठक घेऊन या व्यापाºयाच्या संपर्कात आलेल्या १० व्यापारी, दुकानातील व घरगुती अशा १५ जणांची आरोग्य तपासणी केली. त्यांना वैराग येथील विलगीकरण कक्षात दाखल केले, तर इतर १८ जणांचे इतर ठिकाणी विलगीकरण केले आहे.
संबंधीत व्यापारी तेल, साखर व किराणा मालाचा ठोक व घाऊक विक्रेता असल्याने त्याच्या संपर्कात मोहोळ, तुळजापूर, उत्तर सोलापूर, माढा व बार्शी या तालुक्यांतील सुमारे ३०० ते ४०० किराणा व्यापारी व खरेदीदार आले आहेत. शिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्या १८ जणांना इतर ठिकाणी विलगीकरणाचे काम सुरू असल्याचे प्रांत अधिकारी हेमंत निकम यांनी सांगितले. ही माहिती पोलीस प्रशासनाकडून दुकानाच्या टी.व्ही. फुटेजमधून प्रशासनास प्राप्त झाली असल्याने त्यानुसार त्यांच्या संपर्कातील लोकांना ताब्यात घेतले असून, याबाबत प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून वैराग शहर पूर्णत: लॉकडाऊन केले असून, सर्व व्यवहार बंद झाले आहेत.
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यापाºयामुळे दुकानदारामुळे पोलीस, महसूल व आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. त्या व्यापाºयाच्या संपर्कात आलेले वैराग, अकलूज येथील नातेवाईकांनाही विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
जामगावची दुकाने बंद; परिसर सील - बार्शी तालुक्यातील जामगाव (आ) येथील मुंबई परिसरातून गावाकडे आलेल्या एका व्यक्तीला खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवल्याने ग्रामपंचायत व आरोग्य विभाग सतर्क झाला आहे़ सदर व्यक्ती राहत असलेला गावातील चंदन नगर परिसर सील केला. या भागात औषधांची फवारणी करण्यात आली आहे़ पुढील आदेश येईपर्यंत गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना गावात दवंडीद्वारे देण्यात आल्याचे ग्रामसेवक रणजित माळवे यांनी सांगितले. ही व्यक्ती मुलगी व जावयाकडे राहत होती़ त्याला ग्रामपंचायतीने होम क्वारंटाईन केले होते़ त्याला खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने सोमवारी पुढील उपचारासाठी सोलापूरला नेले आहे़ सदर व्यक्तीचा तपासणी अहवाल अद्याप येणे बाकी आहे़ मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीने सदर व्यक्ती राहत असलेला सर्व परिसर, रस्ते बंद करून सील केले आहेत. परिसरात औषधांची फवारणी केली आहे़ सदर व्यक्तीचा तपासणी अहवाल येईपर्यंत गावातील सर्व दुकाने बंद करण्याबाबत दवंडी देऊन सूचना देण्यात आल्या आहेत़
संपर्कातील अकलूजच्या दोघांना वेळापुरात क्वारंटाईन- वैराग येथील व्यापाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यानंतर वैरागला गेलेले अकलूजचे व्यापारी व त्यांच्या पत्नी या दोघांचे अकलूज उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब घेऊन तपासणीसाठी सोलापूरला पाठविले. त्या उभयतांना वेळापूर येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्या व्यापाºयाच्या कुटुंबातील चार सदस्यांना राहत्या घरी संग्रामनगर येथे होम क्वारंटाईन केले आहे. व्यापारी व त्यांच्या पत्नीच्या येणाºया अहवालावरूनच कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तोपर्यंत त्या व्यापाºयाच्या घरासमोरील माळशिरसला जाणारा रस्ता बंद केला आहे.