सोलापूर : माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावणाºया नवºयाने ऊस तोडणीसाठी आलेल्या महिला मजुराचा खून केल्याची तक्रार मृत महिलेच्या नातलगांनी पोलिसांकडे केली. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यात चिंचपूर येथे शनिवारी घडली.
श्यामका कृष्णा राठोड ( वय २५, रा. कौठाळा, ता. सोनपेठ, जि.परभणी) असे या मृत महिलेचे नाव आहे. कृष्णा साहेबराव राठोड आणि त्याची पत्नी श्यामका हे दोघे ऊस तोडणीच्या कामासाठी चिंचपूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे आले आहेत. सध्या धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याकडे ऊस तोडणीचे काम करीत आहेत.
शनिवारी कृष्णा राठोड आणि त्याची पत्नी श्यामका ऊस तोडणीसाठी शिवारात गेले नाहीत. आम्हाला दवाखान्यात जायचे आहे असे कारण सांगून त्यांनी तोडणीचे काम टाळले. सायंकाळी इतर तोडणी मजूर वस्तीवर आले असता श्यामका ही निपचित पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पती कृष्णाने चक्कर येऊन ती पडल्याचे सांगताच तिला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आणले.
उपचारापूर्वीच श्यामका हिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी पती-पत्नीमध्ये माहेरहून पैसे आणण्यासाठी तक्रारी होत असत. सासू,सासरा आणि पती हे तिचा छळवाद करतात अशी लेखी तक्रार परभणी पोलीस ठाण्यात दिली होती. त्याची प्रत देऊन पती, सासू, सासरा यांनीच श्यामकाला जीवे मारल्याचा गुन्हा नोंदला आहे.