सोलापूर: जगभरात चिंतेचा विषय बनलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण शेजारच्या कर्नाटकात आढळले आहेत. त्यामुळे सोलापूर-कर्नाटकची सीमा बंद करण्यात आली असून, लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश देण्यात येत आहे. ओमायक्रॉन हा सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर धडकल्याने चिंता वाढली आहे.
तुम्हाला आता कर्नाटकात जायचे असेल तर लशीचे दोन डोस घेणे बंधनकारक आहे. इतकेच काय, रेल्वे, बस प्रवास, मॉल, शासकीय कार्यालयांत प्रवेश करताना लसीची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे एकच करा, लस घेतली नसेल तर तातडीने आराेग्य केंद्रावर जा व लस घ्या. कर्नाटक सीमेवर असलेल्या तीन तालुक्यांची वस्तुस्थिती जाणून घेऊया.
सांगोला पडला मागे
जिल्ह्यात सांगोला तालुक्याचे लसीकरण कमी झाले आहे. २ लाख ५८ हजार ७४४ लोकांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे, पण ३ डिसेंबरपर्यंत केवळ १ लाख ७१ हजार ७१५ लोकांनी पहिला डोस घेतला आहे. ६६.३६ टक्के लसीकरण झाले आहे. ५७ हजार ७० लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. २२. ०६ टक्के लसीकरण झाले आहे. लसीकरण वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने मोहीम हाती घेतली आहे.
अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक लसीकरण
अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक ९४.६४ टक्के लसीकरण झाले आहे. २ लाख ५२ हजार ५० इतके लसीकरणाचे उद्दिष्ठ असताना २ लाख ३८ हजार ५३३ लोकांनी पहिला डोस घेतला आहे. ७९ हजार ४७२ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. सोलापूर शहराजवळ तालुका असल्याने पहिल्या व दुसरा लाटेत बाधित आढळले होते. त्यामुळे लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला.
मंगळवेढा तालुक्यात सर्वात कमी
मंगळवेढा तालुक्यात सर्वात कमी लसीकरण झाले आहे. १ लाख ६५ हजार ४ इतके उद्दिष्ट असताना १ लाख ७ हजार २३ लोकांनी पहिला डोस घेतला आहे. ६४.८६ टक्के लसीकरण झाले आहे. ३८ हजार ९१४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. हे प्रमाण केवळ २३.५८ टक्के इतके आहे. कर्नाटक सीमेवर हा तालुका असून, सीमावृत्ती भागात ये - जा असल्याने लसीकरण वाढविणे गरजेचे आहे.
शहरात गावठाण भाग पुढे
सोलापूर शहरातील गावठाण भाग लसीकरणात पुढे आहे. हद्दवाढ भागातील काही नगरे मागे राहिली आहेत. शहरातील ६ लाख ४० हजार ५०३ व्यक्ती लसीकरणास पात्र आहेत. यातील ५ लाख ५ हजार ९६६ जणांनी पहिला तर २ लाख ८१ हजार १८९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ओमायक्रॉनमुळे निर्बंध कडक करण्यात आल्यावर लसीकरणासाठी उरलेल्या लोकांची गर्दी वाढली आहे.