सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतील रस्त्यांची कामे बोगस आहेत. उद्घाटन होऊन दोन वर्षे होत आली तरी उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम मार्गी लागलेले नाही. या पाइपलाइनचे भविष्य काय, असा सवाल भाजपच्या नगरसेवकांनी उपस्थित केला. त्यावर भूसंपादन वेळेत पूर्ण न झाल्यास समांतर जलवाहिनीचा प्रकल्प अडचणीत येईल, असा इशारा स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी दिला.
स्मार्ट सिटीच्या कामांमुळे जोडभावी पेठेत मंगळवारी ड्रेनेजलाइन फुटून अनेक घरांमध्ये पाणी शिरले. या पार्श्वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख यांनी बुधवारी नियोजन भवनमध्ये स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, माजी महापौर शोभा बनशेट्टी, ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील, संजय कोळी, विनायक विटकर, नगरसेविका वंदना गायकवाड, विजयालक्ष्मी गड्डम, अंबिका पाटील, सोनाली मुटकिरी, स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक त्रिंबक ढेंगळे-पाटील, मुख्य तांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी आदी उपस्थित होते.
काही नगरसेवकांनी स्मार्ट सिटीतील काही कामांचे कौतुकही केले. परंतु, रस्ते व ड्रेनेजलाइन करताना तांत्रिक योग्यतेची पडताळणी केली जात नसल्याचा आरोप केला. समांतर जलावाहिनीचे काम भूसंपादनाअभावी थांबले. यात महापालिका कमी पडत असल्याचेही ढेंगळे-पाटील यांनी नगरसेवकांना सांगितले. स्टीलची किंमत वाढल्यामुळे ठेकेदाराने वाढीव पैसे मागितले आहेत. काम असेच थांबले तर कामाची किंमत वाढत राहील. त्यामुळे प्रकल्प अडचणीत येईल, असा इशाराही अधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
रस्त्यांची कामे करताना नियोजन करा. एकाच बाजूचे खोदकाम करा. दुसरी बाजू वाहतुकीसाठी खुली ठेवा. कोरोनामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता रस्ते खोदल्याने वाहतूक बंद आहे. एकाच वेळी सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत. काही कामांवर आम्ही समाधानी आहोत. पण समांतर जलवाहिनीचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांचा पाठपुरावा आवश्यक आहे.
- आमदार विजयकुमार देशमुख.