सोलापूर : सोळा महिन्याच्या मुलीला दारू पाजून तिच्यावर अत्याचार करून, खून केल्याप्रकरणी पती पत्नीला सोलापूर जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. धोलाराम अर्जुनराम बिष्णोई (वय २६), पुनीकुमारी धोलाराम बिष्णोई (वय २० दोघे रा. रामपल्ली आर.एल. नगर हैद्राबाद तेलंगणा, मूळगाव बारासण, तहसील गुडामालाणी, जि. बाडमेर राजस्थान) असे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
खटल्याची पार्श्वभूमी अशी की दोघे ३ जानेवारी २०२२ रोजी मयत १६ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीला धोलाराम बिष्णोई याने त्याच्या राहत्या घरी अल्पवयीन मुलीला दारू पाजले. तिच्यावर नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केला. तिला त्रास होत असल्यामुळे ती रडत होती, तेव्हा ओढणीच्या साहायाने तिचा गळा आवळून खून केला. या कृत्याला पत्नी पुनीकुमारी बिष्णोई हिने मदत केली हाेती.
या प्रकाराची माहिती कोणालाही न देता दोघे मयत मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सिकंदराबादहून राजस्थानकडे जात होते. सिकंदराबाद राजकोट एक्स्प्रेसमध्ये जात असताना प्रवाशांना संशय आला. वाडी येथे डॉक्टर व पोलीस फोर्स उपलब्ध नसल्याने दोघांना सोलापूर येथील रेल्वे स्टेशन येथे पाठवण्यात आले. सोलापुरात दोघांना खाली उतरवून डॉक्टरमार्फत तपासणी केली असता, त्यांना मुलगी मृत असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळाचा पंचानामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. शवविच्छेदनात मुलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी खून, अत्याचार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी काम पाहिले.
---------------
३१ साक्षीदार तपासण्यात आले
- - दि.२६ एप्रिल २०२२ रोजी न्यायालयात खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. दि.६ मे २०२२ पर्यंत सुनावली झाली. सहा दिवसात सरकार पक्षातर्फे सिकंदराबाद, वाडी, सोलापूर, राजस्थान आणि नेपाळ येथील एकूण ३१ साक्षीदार तपासण्यात आले. नेपाळ येथील साक्षीदाराची तपासणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली.
- - हा खटला दुर्मिळ असून १६ महिन्याच्या मुलीवर केलेला अत्याचार अमानुष आहे. आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी केली होती.