सोलापूर : काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयातील मगरींचे विलगीकरण करण्यात आले. हे काम करण्यासाठी सहभागी झालेल्या संस्थांमधील काही कार्यकर्त्यांनी मगरीसोबत स्टंटबाजी करत फोटोसेशन केले, असा आरोप विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी केला आहे. या प्रकाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मगरींच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण रहावे म्हणून नर व मादी मगरींचे काही दिवसांपूर्वी विलगीकरण करण्यात आले. या दरम्यान या कामासाठी काही पर्यावरणप्रेमी व वन्यजीव प्रेमी संस्था सहभागी झाल्या होत्या. विलगीकरण करत असताना मगरीसोबत स्टंटबाजी करत काहींनी छायाचित्र काढली. ही छायाचित्रे सोशल मीडियावरदेखील टाकण्यात आली. या प्रकारामुळे मगरींच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.
मगरीचे विलगीकरण करताना या संस्थेतील काही कार्यकर्त्यांनी मगरींना चुकीच्या पद्धतीने हाताळले. मगर हा प्राणी अनुसूची एकमधील आहे. त्यामुळे हा प्रकार वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार गुन्हा ठरतो. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, वनविभाग आणि महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.