सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या महिला पोलिसाची मोटारसायकल अज्ञात चाेरट्याने चोरून नेली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून, चोरट्याने थेट पोलिसाला आव्हान दिले आहे. हा प्रकार गुरुवारी भर दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
महिला पोलीस कॉन्स्टेबल विद्या रामचंद्र वाणी (वय ३४, रा. केशव नगर पोलीस लाइन, सोलापूर) यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात ड्युटी दिली होती. सकाळी ८ वाजता त्या ड्युटीवर आल्या. त्यांनी आपली मोटारसायकल चौकातील एका दुकानासमोर लावली व रस्त्याच्या कडेला थांबून कामाला सुरुवात केली. शंका आलेल्या वाहनांना अडवून नेहमीप्रमाणे कारवाईला सुरुवात केली. कारवाई करत करत त्या इतरत्र फिरून पुन्हा आपली गाडी लावलेल्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आल्या तेव्हा त्यांना त्यांची मोटारसायकल (क्र.इमचएच १३ बीपी १४२६) जागेवर नसल्याचे आढळून आले. आजूबाजूला चाैकशी केली असता त्यांना गाडीची माहिती नसल्याचे सांगण्यात आले. बराच वेळ झाला तरी गाडी मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर आपली ६० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली. तपास पोलीस नाईक विठ्ठल पैकेकरी करीत आहेत.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- ० चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यात एक रुमाल लावलेला तरुण मोटारसायकल घेऊन जात असताना दिसत आहे. मात्र तोंडाला रुमाल लावल्याने तो नेमका कसा दिसतो हे समजून येत नाही. शहरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे, मात्र थेट महिला पोलीस कर्मचाऱ्याची मोटारसायकल चोरून पोलिसांना अव्हान दिले आहे.
- ० भरदिवसा गजबजलेल्या चौकातून एका पोलीस कर्मचाऱ्याची मोटारसायकल चोरून नेल्याप्रकरणी खळबळ उडाली आहे. जिथे पोलिसांच्या गाड्या सुरक्षित नाहीत तेथे सर्वसामान्यांच्या गाड्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.