सोलापूर : पंढरपुरात पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या एका चहावाल्याचा हॉस्पिटलच्या दारात तडफडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. अँटिजेन टेस्टमध्ये तो पॉझिटिव्ह आल्याने नातेवाईकांनी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारास नेले असता संबंधित डॉक्टरांनी अहवाल आल्याशिवाय उपचार करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप संबंधिताच्या नातेवाईकांनी केला आहे.
पंढरपुरातील इंदिरा गांधी भाजी मार्केटमधील एका चहा विक्रेत्यास बुधवारी सकाळी फणफणून ताप आला. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या रॅपिड अँटिजेन किटद्वारे तपासणी मोहिमेच्या ठिकाणी त्यांना नेले. तपासणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये त्यांना नेले. तेथील डॉक्टरास नातेवाईकांनी आमच्या घरातील व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे, त्यांना उपचारासाठी दाखल करून घ्या म्हणून आग्रह केला. पण तेथील डॉक्टरांनी आधी रिपोर्ट येऊ द्या, मग आम्ही उपचारास दाखल करून घेऊ, अशी भूमिका घेतली. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णास तसेच तिष्ठत ठेवण्यात आले.
यादरम्यान त्या चहा विक्रेत्याचा मृत्यू झाला. ते पॉझिटिव्ह आहेत, हे माहीत असूनही कोविड हॉस्पिटलने वेळेत उपचार न केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याबाबत संताप व्यक्त करीत नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह मंडईतील घराकडे हलविला.
मगच मृतदेहाला हात लावा...
- - घडल्या प्रकाराची माहिती मिळताच मुख्याधिकारी व संबंधित आरोग्य अधिकाºयांनी मंडईत धाव घेतली. त्यावेळी संबंधित मृताच्या नातेवाईकांनी आधी त्या हॉस्पिटलवर कारवाई करा, मगच मृतदेहास हात लावा, अशी भूमिका घेतली.
- - आरोग्य विभागावरचे टेन्शन वाढले. घटनास्थळी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले असून, घडल्या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी या प्रकरणाची माहिती घेत असल्याचे सांगितले.
पंढरपुरातील कथित घटनेबाबत मला आरोग्य यंत्रणेतील कोणीही अद्याप माहिती दिलेली नाही. सोशल मीडियावर आलेली पोस्ट मी पाहिली असून, याबाबत चौकशी सुरू केली आहे. - डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक