सोलापूर : मेलेल्या जनावरांची हाडे आणि आतड्यांपासून तूप व तेलजन्य पदार्थ बनवणाऱ्या तुळजापूर रोडवरील भोगाव परिसरातील सोलापूर महानगरपालिकेच्या कचरा डेपोजवळ असणाऱ्या ट्रिपल ट्रेडिंग कारखान्यावर पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने शुक्रवारी सकाळच्या सुमारास धाड टाकली. त्यात दहा बॅरेल तूप व तेलजन्य पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी कंपनीचे मालक इम्रान अब्दुल मजिद कुरेशी, वसी एन्टरप्रायझेसचा मालक अलिम अब्दुल माजिद कुरेशी या दोघांवर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक नागरिकांनी तुळजापूर रोड परिसरात दुर्गंधी पसरली असल्याबाबतच्या तक्रारी पोलीस आयुक्तांकडे केल्या होत्या. या तक्रारीनुसार पोलीस आयुक्तांनी विशेष पथकाला तेथे पाठवले. तेव्हा तेथे एका जनावरांच्या हाडांचा कारखाना आढळला. या कारखान्यांमध्ये जनावरांच्या हाडांपासून तूपजन्य व इतर पदार्थ बनवले जात असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. यासाठी बेकायदेशीररित्या विजेची चोरी करण्यात येत असल्याचे आढळले. यामुळे याप्रकरणी राज्य विद्युत वितरण मंडळाकडून फिर्याद देण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जीवन निरगुडे, पो.ह. दिलीप भालशंकर, पोना योगेश बर्डे, वाजीद पटेल, संजय साळुखे, नरेंद्र नक्का यांनी केली.
अबब तूप बनवण्यासाठी दहा बाय दहाची कढई
पोलीस पथक जेव्हा या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना तेथे मोठमोठ्या सात कढई दिसून आल्या. त्यात एकामध्ये विविध जनावरांच्या आतड्या भरल्या होत्या. त्याला पेटवण्यासाठी मोठा खाली बंबही होता. ती कढई जवळपास दहा बाय दहा होती. दुसऱ्या कढईमध्ये तूपजन्य पदार्थ दिसून येत होता. तर शेजारीच तुपाने भरलेले डबे आणि जवळपास दहापेक्षा जास्त बॅरेल होते.
तूप सोलापुरात विक्रीस येत होते का? पोलिसांचा तपास सुरू
या कारखान्यावर सर्व मशीन या ॲटोमॅटिक होत्या. हा कारखाना चालवण्यासाठी जेमतेम फक्त तीन ते चार कामगारांची गरज असावी. यातूनच तूपजन्य पदार्थ बनवले जात होते. पण बनवले जाणारे पदार्थ सोलापुरातही विकायला जात होते का याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच ज्या शेतावर हा कारखाना उभारण्यात आला आहे. त्या शेतमालकाची चौकशीही करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.