सोलापूर : कोरोनामुळे येथील प्रसिद्ध रणजीपटू उमेश मनोहर दास्ताने (वय ६४, रा. जानकी नगर, जुळे सोलापूर) यांचे रविवारी रात्री खासगी रुग्णालयात निधन झाले. उमेश दास्ताने यांना १५ दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. उमेश दास्ताने रेल्वेतून मुख्य तिकीट निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. १९७८-७९ साली महाराष्ट्र विरुद्ध गुजरात रणजी सामन्यात ते सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी पंधरा रणजी सामने खेळले. भारतीय रेल्वे क्रिकेट संघाचे माजी उपकर्णधारही होते.
उत्कृष्ट फलंदाज आणि फिरकीपटू अशी त्यांची ओळख होती. उमेश यांनी साऊथ सोलापूर संघाकडूनही अनेक सामने खेळले. त्यानंतर त्यांनी रेल्वे संघाकडून क्रिकेटची सुरुवात केली. सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनतर्फे पाच आॅगस्ट रोजी शोकसभा बोलावण्यात आली आहे.