सोलापूर : कोरोनामुळे उत्तर सदर बझार लष्कर परिसरातील एका ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या आता नऊवर पोहोचली आहे. या महिलेवर मंगळवारी दुपारी मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
लष्कर परिसरातील या महिलेला तीन मे रोजी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हेाते. या महिलेची प्रकृती गंभीर होती. उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे ४.४५ वाजता या महिलेचे निधन झाले. या महिलेच्या कोव्हीड-१९ टेस्टचा अहवाल सकाळी मिळाला. या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या महिलेच्या संपर्कातील नागरिकांना महापालिकेने ताब्यात घेतले आहे. शासकीय रुग्णालयात आणखी चार जणांचे मृतदेह आहेत. या चार व्यक्तीच्या स्वॅब चाचणीचे अहवाल अद्याप मिळालेले नाहीत. परंतु, या अहवालांकडे लक्ष असणार आहे.
सोलापूर शहरात मंगळवारी नव्याने दहा रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ग्रामीण पोलिस दलातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यानंतर उळेगाव, वालचंद कॉलेजजवळील एकता नगर, विजापूर रोडवरील हुडको कॉलनी, राहूल गांधी झोपडपट्टी परिसरातील रुग्णांचा समावेश आहे.
अशी आहे जिल्ह्याची स्थिती
जिल्ह्यात आतापर्यंत १४५ रुग्ण आढळून आले आहेत. यात ९ जणांचा मृत्यू झाला असून चार पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. सध्या ११२ जणांवर शासकीय रुग्णालय, कुंभारी येथील खासगी रुग्णालय, रेल्वे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. उपचारानंतर २४ जणांना घरी पाठवण्यात आले आहे.