सोलापूर : सोलापूर लोकसभेचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जात प्रमाणपत्राविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीवर जात प्रमाणपत्र समितीने निकाल अंतिम केला असून, निकालपत्र देण्यासाठी कार्यालयात बोलावले आहे अशी माहिती तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्यावेळेस जयसिद्धेश्वर यांच्या विरोधात प्रमोद गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी त्यांनी जयसिद्धेश्वर यांच्या बेडा जंगम या जातप्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता. पण निवडणूक निर्णय अधिका-यांनी आक्षेप फेटाळल्यानंतर या जात प्रमाणपत्राविरुद्ध प्रमोद गायकवाड, विनायक कंदकुरे आणि मिलिंद मुळे यांनी जात पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर १५ फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी झाली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन समितीने निकाल राखून ठेवला होता.
आज निकाल देण्यासाठी तक्रारादरांना समितीने बोलावून घेतले आहे असे गायकवाड यांनी सांगितले. निकाल आमच्या बाजूने लागला असल्याचे कार्यालयातून सांगण्यात आल्याचेही ते म्हणाले. १५ फेब्रुवारी रोजी अंतिम युक्तीवादात खासदार जयसिद्धेश्वर यांचे वकील संतोष न्हावकर यांनी दक्षता पथकाने फसली उताºयाबाबत दिलेल्या अहवालावर म्हणणे दाखल केले होते. दक्षता पथकाने दबावाखाली अहवाल दिलेला आहे. तक्रारदारांच्या सांगण्यावरून तयार करण्यात आलेला हा अहवाल रद्दबातल करून दक्षता पथकातील उपअधीक्षक व पोलीस निरीक्षकांना बदलून नवीन अधिकाºयांमार्फत अहवाल मागविण्यात यावा असा अर्ज दाखल केला.
या अर्जाविरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे हे प्रकरण तूर्त स्थगित करावे व दक्षता पथक यांनी नोंदविलेले जबाब व साक्षीदारांची उलट तपासणी करायची आहे, तसेच साक्ष तपासण्यासाठी कमिशन नेमण्याबाबत असे अर्ज समितीसमोर सादर केले. तसेच जयसिद्धेश्वर यांनी वडिलांच्या शेती उताºयाबाबत (फसली उतारा: सन १९४४ व १९४७)सादर केलेल्या उताºयावर नोंद असलेल्या मालक बापू यमाजी पाटील यांच्या नातूचे प्रतिज्ञापत्र व त्यासोबत इतर ११ जणांचे प्रतिज्ञापत्र, बेडा जंगम या समाजाने खासदारांना दिलेले जातीचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे यादीसह सादर केली. बेडा जंगम या जातीचा अनुषंगाने अधिनियम २0१२ च्या कलम १३ (१) डी अन्वये संशोधन करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल दाखल करण्याबाबत दक्षता पथकाच्या अधिका-यांना आदेश द्यावेत अशी मागणी केली होती.
तसेच तक्रारदारांनी वेळोवेळी समितीवर भ्रष्टाचाराचे आरोप करूनसुद्धा त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही आणि प्रत्येक सुनावणीमध्ये समितीचे अध्यक्ष व सदस्य हे तक्रारदार यांच्या दबावाखाली काम करीत आहेत. जयसिद्धेश्वर यांना पुरावा देण्याची संधी न देता घाईगडबडीने निकाल देण्याचा प्रयत्न समितीने करू नये. त्यामुळे ही तक्रार या समितीसमोर न चालविता महाराष्ट्रातील इतर कोणत्याही समितीसमोर चालवावी अशी मागणी करणारा अर्ज सामाजिक न्याय विभाग मंत्रालय मुंबई येथे सकाळी सादर केला असल्याबाबतचा अर्ज समितीस देण्यात आला.
या अर्जावर निर्णय होईपर्यंत कामकाज थांबवावे अशी विनंती केली होती. पण जातपडताळणी समितीने सर्व अर्ज फेटाळून लावले. तक्रारदार गायकवाड, कंदकुरे, मुळे यांनी खासदार जयसिद्धेश्वर यांनी तक्रारीच्या अनुषंगाने सादर केलेले पुरावे संशयास्पद आहेत. मूळ दाखला त्यांनी समितीसमोर आणलेला नाही. अक्कलकोट तहसीलदार व तलमोडचा फसली उतारा बनावट आहे. त्यामुळे त्यांचे जातप्रमाणपत्र रद्द करून जयसिद्धेश्वर यांच्यासह त्यांच्या वकिलांवरही फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत जात पडताळणी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सूळ, सदस्य सचिव संतोष जाधव, सदस्य छाया गाडेकर यांनी या प्रकरणाची सुनावणी बंद करीत असून, निकाल राखीव ठेवल्याचे सांगितले होते.
त्यानुसार जातपडताळणी समितीने आज निकाल अंतिम केला आहे. निकालाची प्रत घेण्यासाठी तक्रारदारांना कार्यालयात बोलाविण्यात आले आहे. थोड्याच वेळात निकालाची प्रत हातात पडल्यावर खासदार जयसिद्धेश्वर यांच्या बेडाजंगम जात प्रमाणपत्राबद्दल समितीने काय निकाल दिला हे स्पष्ट होणार आहे.